तोतया आएएस अधिकाऱ्यास अटक
By Admin | Updated: August 19, 2015 00:25 IST2015-08-19T00:25:41+5:302015-08-19T00:25:41+5:30
मलकापूरजवळ कारवाई : सहकारीही गजाआड; योजनेच्या लाभाने फसवणूक

तोतया आएएस अधिकाऱ्यास अटक
मलकापूर : योजना आयोगामार्फत विविध योजनांचा लाभ देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी वसंत ज्ञानू पाटील (रा. पेरिड, ता. शाहूवाडी) याच्यासह दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चारचाकी गाडी, बोगस कागदपत्रे हस्तगत केली आहेत. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी, दुपारी तीन वाजता पिशवी-सोनवडे रस्त्यावर शाहूवाडी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. वाहनांची तपासणी करीत असता अचानक भरधाव वेगाने भारत सरकार असे लिहिलेली अम्बॅसेडर गाडी आली. ती थांबविताच त्यातील एका युवकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला पकडून शाहूवाडी पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याजवळ बोगस कागदपत्रे होती. यावेळी प्रमुख संशयित वसंत पाटील (पेरिड), महेश सीताराम गुरव, सुप्रिया नागेश गुरव (रा. खडीओजरे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांत जाऊन योजना आयोगाचा लाभ मिळवून देतो, असे सांगून नागरिकांकडून पैसे घेऊन त्याची फसवणूक हे सर्व करीत होते. त्यांची गाडीदेखील चोरीची असल्याचे समजते. काटे भोगाव (ता. पन्हाळा) येथे त्यांचे वास्तव होते. या टोळीत अनेक तरुणांचा समावेश असल्याचे समजते. वसंत पाटील हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याच्यावर शाहूवाडी, कराड, इस्लामपूर, शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. जे.सी.बी. मशीन, डंपर, ट्रक, जनरेटर, आदी साहित्यांची चोरी करून तो गेली तीन वर्षे फरार होता.
शाहूवाडी पोलीस ठाण्यात पिस्तूल जवळ बाळगल्याचा गुन्हा देखील त्याच्यावर नोंद आहे. त्याने नोकरी लावतो म्हणून नागरिकांची फसवणूक केली आहे. एक महिन्यापूर्वी पोलिसांनी त्याला पकडण्याचा कसोसिने प्रयत्न केला असता तो पळाला होता. (प्रतिनिधी)