पुनर्वसनासाठी नशिबी हेलपाटे
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T23:59:26+5:302015-07-25T01:13:31+5:30
निधीची कमतरता : प्रकल्पास गती मिळण्याची गरज

पुनर्वसनासाठी नशिबी हेलपाटे
रवींद्र येसादे - उत्तूर -गेली १५ वर्षे आंबेओहळ प्रकल्पासाठी शासनाने जमिनी ताब्यात घेतल्या असून, धरणग्रस्तांचे पुनर्वसन संथगतीने सुरू आहे. प्रकल्पातील एकूण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या ३९५ हेक्टर क्षेत्रापैकी ३८५ हेक्टर क्षेत्राची संपादन कार्यवाही पूर्ण झाली असून, १०.०७ हेक्टर क्षेत्राचे संपादन अंतिम निवाड्यावर आहे.
आम्हाला आमच्या हक्काच्या जमिनी हव्यात. त्या लाभक्षेत्रातून मिळाव्यात ही धरणग्रस्तांची भूमिका आहे. मात्र, लाभधारक जमिनी संपादन करावयास गेले असता मूळमालक त्यांना येऊ देत नाहीत. यामुळे कोर्टकचेऱ्या सुरू आहेत. यासाठी शासनाने कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.
सांडवा क्षेत्रातील पुनर्वसन
उत्तूर, करपेवाडी व आर्दाळ गावांमध्ये धरण पाया, सांडवा व खाणक्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना १२४ हेक्टर क्षेत्र देय होते. त्यानुसार उत्तूर व कडगाव येथे जमिनी उपलब्ध होत्या. धरणग्रस्तांच्या पसंतीनुसार काहींना जमिनींचे वाटप प्राधान्यक्रमानुसार झाले आहे.
बुडीत क्षेत्रातील पुनर्वसन
आर्दाळ, हालेवाडी, होन्याळी, महागोंड, वडकशिवाले, आदी गावांतील बुडीत क्षेत्रातील ३८७ हेक्टर देय होती. प्रकल्पांतर्गत ३५५ खातेदारांची स्वेच्छा पुनर्वसन मागणी आहे. मंजूर ५.३८ कोटींच्या स्वेच्छा अनुदानापैकी २.२५ कोटी अनुदानाचे वाटप झाले आहे. प्रकल्पात ८२२ खातेदार आहेत. ४६७ खातेदारांनी ६५ टक्के रक्कम शासनास भरणा केली आहे. त्यांना ३२८ हेक्टर पर्यायी जमीन देय असून, आजअखेर ५३ खातेदारांना ३२.० हेक्टर जमीन वाटप केली आहे. आर्दाळ, हालेवाडी, होन्याळी, महागोंड व वडकशिवाले या गावांमधील बुडीत क्षेत्रातील जमिनींचे वाटप सुरू आहे.
प्रकल्पग्रस्तांना धरणग्रस्तांचे दाखले, भविष्यनिर्वाह भत्ता, गावठाण, आदी कामे ६० टक्क्यांपर्यंत पूर्ण आहेत. शासनदरबारी निधीची कमतरता असल्याने पुनर्वसन रखडले आहे.
(समाप्त)
करपेवाडीत गुंता
करपेवाडी येथील क्षेत्रावर मालकी हक्कासंबंधी शेतकरी विरुद्ध जगद्गुरू ट्रस्ट दावा चालू आहे. ३९ शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. स्वेच्छा पुनर्वसन मोबदला वाटप नाही. सानुग्रह अनुदानाचे वाटप मंजूर असूनही मिळाले नाही. करपेवाडीच्या क्षेत्रावरील वर्ग-२ च्या शेऱ्याबाबत माहिती मिळत नसल्याने करपेवाडीकर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. निधीची तरतूद झाल्यास हे सर्व प्रश्न सुटू शकतात.
गावठाण सद्य:स्थिती
उत्तूर, आर्दाळ, करपेवाडी, व्होन्याळी व हालेवाडी या गावांसाठी लिंगनूर येथे, तर महागोंड, वडकशिवाले या गावांसाठी कडगाव येथे गावठाण मंजूर आहेत. नागरी सुविधा पूर्ण होण्यासाठी जादा निधीची गरज असून, त्याचे काम संथगतीने सुरू आहे.