मटकाकिंग दोड्डमणीचा अड्डा उद्ध्वस्त
By Admin | Updated: August 31, 2015 00:26 IST2015-08-31T00:26:58+5:302015-08-31T00:26:58+5:30
दोड्डमणी फरार : तीन एजंटांसह सहाजणांना अटक; ७८ हजारांचा माल जप्त

मटकाकिंग दोड्डमणीचा अड्डा उद्ध्वस्त
सांगली : येथील शंभरफुटी, चांदणी चौक व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात मटक्याचे साम्राज्य वाढविलेल्या मटकाकिंग काशिनाथ दोड्डमणी याच्या अड्ड्यावर शनिवारी रात्री पोलिसांनी छापे टाकले. छाप्याची चाहूल लागल्याने दोड्डमणी फरार झाला. मात्र त्याच्या तीन एजंटांसह मटका खेळण्यास आलेल्या तीन ग्राहकांना अटक केली आहे. सात मोबाईल, रोकड, मटक्याचे साहित्य असा ७८ हजाराचा माल जप्त करण्यात आला आहे.अटक केलेल्यांत एजंट प्रकाश पांडुरंग लवाटे (वय ४९, रा. शामरावनगर), दुंडाप्पा अण्णाप्पा अजूर (२४, रा. शंभरफुटी रस्ता), संतोष नारायण पाटील (३७, त्रिमूर्ती कॉलनी) व मटका खेळायला आलेले ग्राहक ज्ञानेश्वर शरणाप्पा बिरगे (२७, रेवतगाव, ता. इंडी, सध्या धामणी रस्ता, सांगली), मारुती परशुराम बंडगर (३२) व अनिल बाबूराव वायदंडे (४३, दोघे रा. दत्तनगर, विश्रामबाग, सांगली) यांचा समावेश आहे. या सर्वांना रविवारी सकाळी न्यायालयात उभे करण्यात आले होते. पोलिसांनी सर्वांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे. फरार झालेल्या दोड्डमणीचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले.जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश गुंडाविरोधी पथक व विशेष पथकाला दिले आहेत. दोन्ही पथकांनी संयुक्तपणे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक विजयकुमार मराठे, आरती बनसोडे यांच्या मदतीने दोड्डमणीच्या शंभरफुटी रस्त्यावर सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात एजंट दुंडाप्पा अजूर व मटका खेळायला आलेले तीन ग्राहक सापडले. त्यांच्याकडून पाच मोबाईल, नऊ हजाराची रोकड, मटक्याचे साहित्य असा एकूण २५ हजाराचा माल जप्त केला.सिव्हिल हॉस्पिटल व चांदणी चौक परिसरातही दोड्डमणीचे अड्डे सुरू असल्याची माहिती मिळताच पथकाने तिथेही एकाचवेळीछापे टाकले. तिथे एजंट प्रकाश लवाटे व संतोष पाटील सापडले. त्यांच्याकडून ५२ हजार ५१५ रुपयांची रोकड, दोन मोबाईल, मटक्याचे साहित्य असा ५४ हजार ५२५ रुपयांचा माल जप्त केला. या दोन्ही कारवायांची चाहूल लागल्याने दोड्डमणी फरार झाला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरु होता. पण तो सापडला नाही. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोनच दिवसांपूर्वी या पथकाने मिरजेत बुकीमालक संतोष कोळी याचा अड्डा उद्ध्वस्त केला होता. कोळीसह सहाजणांना अटक केली होती. त्यानंतर पुन्हा सांगली शहरातही छापासत्र सुरू झाल्याने अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.
कारवाईच्या भीतीने काही ठिकाणचे मटका अड्डे बंद झाले होते. दरम्यान, पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी या कारवाईची दखल घेऊन, अवैध धंदे बंद झाले पाहिजेत, असा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)
दोड्डमणी पुन्हा रेकॉर्डवर
पोलिसांच्या रेकॉर्डवर पूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला मटकाकिंग यल्लाप्पा दोड्डमणी याचा काशिनाथ हा मुलगा आहे. यल्लाप्पा दोड्डमणी ‘मामा’ या नावाने प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षापासून त्याचा मटका अड्डा बंद होता. पण पोलिसांनी कारवाई केल्याने ‘मामा’ आणि त्याचा मुलगा काशिनाथ पोलिसांच्या रेकॉर्डवर आल्याने पुन्हा चर्चेत आले आहेत. याची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.