उद्ध्वस्त पीक.... हतबल शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST2021-04-28T04:25:14+5:302021-04-28T04:25:14+5:30
शशिकांत भोसले लोकमत न्यूज नेटवर्क सेनापती कापशी : सोमवारी सायंकाळी चिकोत्रा खोऱ्यातील नंद्याळ, अर्जुनवाडा, करड्याळ, मुगळी, जैन्याळ (ता. कागल) ...

उद्ध्वस्त पीक.... हतबल शेतकरी
शशिकांत भोसले
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनापती कापशी : सोमवारी सायंकाळी चिकोत्रा खोऱ्यातील नंद्याळ, अर्जुनवाडा, करड्याळ, मुगळी, जैन्याळ (ता. कागल) आदी गावांंना वळवाच्या पावसासह जोरदार बर्फवृष्टीने झोडपून काढले. यामुळे शेतातील सर्व पीक उद्ध्वस्त झाले असून शेतकरी हतबल झाला आहे. वळीव पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडेच मोडून पडले आहे. या पार्श्वभूमीवर आज कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या तज्ज्ञ समितीने या भागात दौरा करून नुकसानीची पाहणी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. उद्योग व्यवसाय बंद पडत असल्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी या परिसरातील तरुण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कलिंगड, काकडी, बावची, वांगी , दोडका, मिरची, मका, ज्वारीचे प्लांट केले. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, पण वळीव पावसाचा तडाखा सोबत जोरदार बर्फवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भाजीपाला व कलिंगड, काकडी, ऊसपीकासह शेतातील संपूर्ण पीकच जमिनदोस्त झाले आहे. गारपिटीने ऊसाच्या पालाच्या अक्षरशः चिंध्या- चिंध्या झाल्या असून झाडांची अवस्थाही दयनीय झाली आहे. संपूर्ण पाला झडून गेला आहे. झाडांचे आंबे तर मातीत कुजून गेले आहेत.
अर्जुनवाडा
गारपिटीने अर्जुनवाडा, नंद्याळ, करड्याळ, मुगळी, जैन्याळ गावातील भाजीपाला व इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक दृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. या गावातील शेतकऱ्यांना तातडीने विशेष पॅकेज देऊन नुकसान भरपाई द्यावी. तत्काळ पंचनामे सुरू करावेत. नुकसानीचा आकडा मोठा असल्याने शेतकरी आता शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे.
कोट...
नंद्याळ येथे कोरोनामुळे मोठे संकट उभारले असतानाही या परिसरातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली. पण सोमवारी झालेल्या गारपिटीने या सगळ्यावर पाणी फेरले आहे.. हातातोंडाशी आलेले सर्व पीक जमिनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक बोजा सहन करावा लागला आहे. शेतकरी हतबल झाला असून यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी.
सागर पाटील, प्रगतशील शेतकरी ,
नुकसानीची पाहणी करून शासनाला अहवाल देणार
मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आज कृषी विद्यापीठमधील तज्ज्ञ व कृषी विभागाचे अधिकारी मिळून या परिसरात झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहणी केली. तत्काळ काय उपाययोजना करता येतील याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तज्ज्ञ समितीकडून याबाबत शासनाकडे अहवाल देण्यात येईल. शासनाचे पुढील आदेश आल्यानंतरच पंचनामे करण्यात येतील,असे तालुका कृषी अधिकारी ए. डी. भिंगारदिवे यांनी सांगितले.
फोटो:- नंद्याळ, अर्जुनवाडा, करड्याळ, मुगळी, जैन्याळ (ता. कागल) आदी गावात जोरदार वळीव व बर्फवृष्टी झाल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करताना उपविभागीय कृषी अधिकारी आर.जी.पाठक, तालुका कृषी अधिकारी ए. डी .भिंगारदिवे, मंडल कृषी अधिकारी ए. ए. माने, कृषी सहाय्यक सुनील बुगडे, कृषी सहाय्यक संदीप कांबळे, तलाठी पी. ए. कांबळे, कृषी मित्र दिलीप पाटील