‘आधार’ असूनही निराधार...

By Admin | Updated: February 19, 2015 23:37 IST2015-02-19T23:28:41+5:302015-02-19T23:37:41+5:30

ई-आधार कार्ड ठरविले अनधिकृत : ज्येष्ठ नागरिकाची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार

Despite the 'base' | ‘आधार’ असूनही निराधार...

‘आधार’ असूनही निराधार...

प्रवीण देसाई -कोल्हापूर -नागरिकांना खरी ओळख देणाऱ्या आधार कार्डची आता गॅसबरोबर रेशन व्यवस्थेमध्येही सक्ती होऊ लागली आहे. ते मिळविताना नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ई-आधार कार्ड असूनही ते ग्राह्य धरले जात नसल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. याविरोधात नुकतीच एका ज्येष्ठ नागरिकाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली आहे. नेहरूनगर, चिले कॉलनी परिसरातील जयवंत गणपती पेडणेकर या ज्येष्ठ नागरिकाने वर्षापूर्वी काढलेले आधार कार्ड अद्याप मिळालेले नाही. रेशनसाठी ते आवश्यकच असल्याचे सांगितल्यामुळे त्यांनी नेटवरून ई-आधार कार्ड काढले आहे. जोपर्यंत आपल्या घरी पोस्टाने हे कार्ड येत नाही, तोपर्यंत ई-कार्डच ग्राह्य धरण्यात येते. सध्या बहुधा हे कार्डच ग्राह्य धरले जात आहे; परंतु पेडणेकर यांना हे कार्ड अधिकृत नसून ते ग्राह्य धरले जात नसल्याचे सांगण्यात आले. या कार्डवर आपले नाव आहे, पत्ता आहे, शिवाय फोटोही आहे; असे असताना हे कार्ड गृहीत न धरणे म्हणजे या वयात अशा ज्येष्ठ नागरिकांची एकप्रकारे केलेली थट्टाच म्हटले तर वावगे ठरणार नाही; परंतु त्यांनी यावर गप्प न बसता आपल्यासारखा अन्याय इतर कुणावरही होऊ नये, यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिला आहे.
जर नेटवर ई-आधार कार्ड मिळत असेल तर ते नागरिकांना मिळण्यास वेळ का लागतो किंवा त्यांना ते का मिळत नाही? ते येत नसेल तर हातात असलेले ई-कार्ड का ग्राह्य धरले जात नाही? असा त्यांचा सवाल आहे. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. ई-आधार कार्ड हे अधिकृत असून, ते ज्या ठिकाणी आवश्यक आहे, तेथे ते गृहीत धरलेच पाहिजे. जर कोणी याबाबत शंका उपस्थित करीत असेल तर ते चुकीचे आहे, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
एका बाजूला रेशनचे अनुदान ग्राहकाच्या बॅँक खात्यावर जमा करण्यासाठी आधार कार्डही गरजेचे आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी कार्ड काढण्यासाठी कॅँप लावले जात आहेत; परंतु ज्यांचे कार्ड ई-आधारच्या माध्यमातून मिळाले आहे, त्यांचे कार्ड गृहीत धरले जात नाही. त्यांनी काय करायचे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. या सावळ्यागोंधळाचा मानसिक त्रास आणि आर्थिक फटकाही नाहक नागरिकांना बसत आहे. याबाबत काहीतरी ठोस भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


ई-आधारकार्ड ग्राह्य धरण्याची मागणी
हे कार्ड चालत नसेल तर ‘आधार’चे दुसरे कार्ड कुठले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्यासारखा अन्याय इतरांवर होऊ नये, तसेच त्यांची फसवणूकही होऊ नये, यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार अर्ज दिला आहे.
- जयवंत पेडणेकर, ज्येष्ठ नागरिक

Web Title: Despite the 'base'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.