बिलावर यांची निवड रद्द करा
By Admin | Updated: December 24, 2014 00:21 IST2014-12-23T23:16:25+5:302014-12-24T00:21:34+5:30
गडहिंग्लज नगरपालिका : विरोधी नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बिलावर यांची निवड रद्द करा
गडहिंग्लज : विषय समित्यांच्या सभापती निवडणुकीत एका सदस्याला दोन समित्यांच्या सभापतिपदाच्या उमेदवारांचे सूचक किंवा अनुमोदक होता येत नसल्यामुळे महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी झालेली सुंदराबाई बिलावर यांची बेकायदेशीर निवड रद्द करावी, अशी मागणी विरोधी जनता दल-जनसुराज्य व काँगे्रस आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, बांधकाम व नगरविकास सभापतिपदासाठी रामदास कुराडे यांनी, तर वाचनालय व शिक्षण समिती सभापतिपदासाठी मंजूषा कदम यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. मात्र, त्या दोघांच्याही नामनिर्देशनपत्रावर अनुमोदक म्हणून किरण कदम यांनी स्वाक्षरी केली आहे.
नगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार एका सदस्याला दोन ठिकाणी सूचक किंवा अनुमोदक होता येत नसल्यामुळे पीठासन अधिकाऱ्यांनी कदम व कुराडे यांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरवून बांधकाम व वाचनालय समिती सभापतिपदाची निवडणूक रद्द केली.
तथापि, आमची हरकत विचारात न घेता महिला व बालकल्याण समिती सभापतिपदाच्या उमेदवार सुंदराबाई बिलावर यांचा अर्ज वैध ठरवून त्यांची सभापतिपदी निवड जाहीर केली. बिलावर यांच्या नामनिर्देशनपत्रावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केलेल्या सरिता गुरव यांनी वाचनालय समिती सभापतिपदाच्या उमेदवार कदम यांच्या नामनिर्देशनपत्रावर सूचक म्हणून स्वाक्षरी केली आहे.
बांधकाम व वाचनालय या समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडीतील कायदेशीर हरकतीनुसार कदम व कुराडे यांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरवून त्या निवडी पीठासन अधिकाऱ्यांनी रद्द केल्या. त्याच कायद्याप्रमाणे नामनिर्देशनपत्र अवैध ठरवून महिला व बालकल्याण सभापती बिलावर यांची निवड रद्द करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर, विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी, जनसुराज्यचे नगरसेवक नरेंद्र भद्रापूर यांच्यासह ९ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)