उपमहापौर, शिक्षण सभापतींचे राजीनामे
By Admin | Updated: July 5, 2015 00:49 IST2015-07-05T00:49:36+5:302015-07-05T00:49:36+5:30
महापौरांचा कार्यालय प्रवेश : उपमहापौरपदासाठी चढाओढ; प्रत्यक्ष कामासाठी अल्पकाळ असल्याने धावपळ

उपमहापौर, शिक्षण सभापतींचे राजीनामे
कोल्हापूर : तृप्ती माळवी यांच्या लाचखोरी प्रकरणाचा महापालिकेवरील डाग अखेर शनिवारी नूतन महापौरांची निवड झाल्यानंतर पुसला गेला.
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता आॅगस्ट महिन्यात लागणार असल्याने दोन महिन्यांचा अल्प काळच नूतन महापौर वैशाली डकरे यांना मिळणार आहे. त्यामुळे निवडीनंतर महापौरांनी तत्काळ कार्यालय प्रवेशाचे सोपस्कार पूर्ण केले. यानंतर ठरल्याप्रमाणे उपमहापौर मोहन गोंजारे व शिक्षण मंडळाचे सभापती संजय मोहिते यांनी महापौरांकडे राजीनामा सादर केला.
उपमहापौर व शिक्षण मंडळ सभापतिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे.
उपमहापौरपदाच्या निवडीचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांकडून येत्या दोन दिवसांत जाहीर केला जाईल; तर शिक्षण मंडळ सभापतीची निवड मंडळाचे सदस्य मंगळवारी (दि. १४) करणार आहेत. शिक्षण मंडळ सभापतिपदी महेश जाधव यांची निवड अंतिम असल्याचे मानले जाते; तर उपमहापौरपदासाठी ‘जनसुराज्य’च्या मृदुला पुरेकर, राष्ट्रवादीचे जालंदर पवार, मधुकर रामाणे, भूपाल शेटे यांच्यापैकी एकाची वर्णी लागणार आहे.
दरम्यान, महापौरांनी निवडीनंतर तत्काळ कामकाज सुरू केले. माळवी यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने काहीशी मरगळ आलेल्या कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांत दिवसभर उत्साह जाणवत होता.
कॉँग्रेसचे नगरसेवक दिवसभर महापालिकेत उपस्थित होते. येत्या निवडणुकीसाठी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महापौर निवड हा बूस्टर डोस ठरणार आहे.
सतेज पाटील गट सक्रिय
गेल्या पावणेपाच वर्षांच्या महापालिकेच्या सत्तास्थापनेनंतर प्रथमच सतेज पाटील महापालिकेत आले. सकाळी महापौरांना ते स्वत:च्या गाडीतून महापालिकेत घेऊन आले, तर चार वाजता स्मार्ट सिटीसाठी आयोजित बैठकीत सहभाग नोंदवून त्यांनी प्रशासनास सूचना केल्या. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सतेज पाटील गट पुन्हा जोमाने सक्रिय झाल्याने नगरसेवक व कार्यकर्त्यांत मोठा उत्साह संचारल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)