कोल्हापूर : राज्यात महायुतीला आणि शिंदेसेनेलाही भरभरून यश दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी, ५ एप्रिल रोजी सरवडे (ता. राधानगरी) येथे येणार आहेत. सायंकाळी पाच वाजता त्यांची या ठिकाणी कृतज्ञतेची जाहीर सभा होणार आहे.पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या कृतज्ञता सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला असून, शिंदेसेनेचे पदाधिकारी तयारीला लागले आहेत. शिंदे हे शनिवारी सायंकाळी मुंबईहून निघून कोल्हापुरात येणार असून, कार्यक्रम आटोपून रात्रीच पुन्हा मुंबईला रवाना होणार आहेत.याबाबत माहिती देताना आबिटकर म्हणाले, जनतेने शिंदेसेनेला आणि महायुतीला मोठा प्रतिसाद दिला आहे. ज्यांच्या पाठबळावर आम्ही जिंकू शकलो, अशा मतदारांविषयी, जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून सरवडे येथे हा कार्यक्रम होणार आहे.माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कॅबिनेट मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद देऊन त्यांनी राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांतील जनतेचाही सन्मान केला आहे. त्यामुळे त्यांचे मतदारसंघात स्वागत करण्यासाठी आम्हीही अतिशय आतूर आहोत. शिंदे यांच्यासोबत शिंदेसेनेचे किती मंत्री येणार आहेत, हे लवकरच निश्चित होणार असल्याचे सांगण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर, सरवडेत जाहीर सभा होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:01 IST