कार्यालयात ठेवीदारांची रांग

By Admin | Updated: April 18, 2015 00:06 IST2015-04-17T23:20:29+5:302015-04-18T00:06:05+5:30

‘मायक्रो’चा घोटाळा : कंपनी आॅगस्टमध्येच बंद

Depositors' queues in the office | कार्यालयात ठेवीदारांची रांग

कार्यालयात ठेवीदारांची रांग

आजरा : मायक्रो फायनान्स कंपनी आॅगस्टपासूनच बंद असल्याचे ठेवीदारांना एप्रिल महिन्यात समजत असल्याने ठेवीदार चक्रावले असून, बंद कंपनीत गेले नऊ महिने पैसे भरून घेतले जात असल्याने हा नेमका प्रकार काय आहे? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधार्थ शुक्रवारी दिवसभर बुरुड बिल्डिंगमधील शाखा कार्यालयात ठेवीदारांची रीघ लागली होती. एक रुपयाचाही परतावा कोणालाही मिळाला नाही.कंपनीच्या मुख्य भुवनेश्वर येथील मुख्य कार्यालयास आॅगस्ट महिन्यातच टाळे लागले आहे. असे असतानाही पिग्मी गोळा करण्याचे काम १५ एप्रिल २०१५ पर्यंत सुरूच होते. बंद कंपनीची पिग्मी गोळा करून गेल्या आठ महिन्यांत जमा झालेले लाखो रुपयांचे काय झाले? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ठेवीदारांची संख्या अडीच हजारांच्या पुढे, तर ठेवीचा आकडा साडेनऊ कोटी रुपये असल्याचे समजते.कंपनी बंद झाल्याचे स्थानिक कर्मचाऱ्यांना समजल्यानंतर मायक्रो फायनान्स कंपनीऐवजी मायक्रो फायनान्स बहुराज्य सहकारी पतसंस्थेच्या नावावर काही नवीन व्यवहार सुरू होते. कंपनीच्या ठेवी या संस्थेच्या नावावर वर्ग केले जात असल्याचे कर्मचारी वर्गाकडून सांगितले जात होते. हा नेमका प्रकार काय आहे हे समजण्यापलीकडचे आहे. शुक्रवारी आठवडा बाजाराचा दिवस असल्याने ठेवीदारांनी आजरा शाखेत प्रचंड गर्दी केली होती. दुपारनंतर शाखेला टाळे ठोकून कर्मचाऱ्यांनी पळ काढला. दुपारनंतर पिग्मी एजंट व कर्मचारी ‘नॉट रिचेबल’ होते. (प्रतिनिधी)


शिवसेना बनली आक्रमक
‘मायक्रो फायनान्स’प्रकरणी शिवसेना आक्रमक झाली असून, सेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, आदींच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर पाटील यांना भेटून यातील सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. सर्व कागदपत्रे पोलिसांनी तातडीने ताब्यात घ्यावीत, कंपनीने जमा केलेले सर्व पैसे ठेवीदारांना त्वरित परत द्यावेत, अशी मागणी सेनेने केली आहे.
नागरिकांनी तक्रारी
द्याव्यात : डॉ. पाटील
ज्या ठेवीदारांचे पैसे या कंपनीत अडकले आहेत त्यांनी आजरा पोलीस ठाण्यात तातडीने लेखी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी केले आहे.

Web Title: Depositors' queues in the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.