राधानगरी तालुक्यातील पायी दिंड्यांचे माघ वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:22 IST2021-02-14T04:22:54+5:302021-02-14T04:22:54+5:30
एकीकडे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर देवस्थान समितीने घालून दिलेल्या अटी व शर्ती, तर दुसरीकडे सावळ्या विठ्ठलाच्या भेटीकडे गेल्या अकरा ...

राधानगरी तालुक्यातील पायी दिंड्यांचे माघ वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान
एकीकडे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर देवस्थान समितीने घालून दिलेल्या अटी व शर्ती, तर दुसरीकडे सावळ्या विठ्ठलाच्या भेटीकडे गेल्या अकरा महिने आस लावून बसलेला वारकरी अशा द्विधा मन:स्थितीत राधानगरी तालुक्यातील अनेक गावांतील पायी दिंड्यांनी शनिवारी पंढरपूरकडे प्रस्थान केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघ वारी सोहळा होणार की नाही, अशी शंका अनेक विठ्ठलभक्तांना लागली होती. त्यामुळे माघ वारीसाठी पायी दिंड्या जाणार की नाही, अशी भीती वारकऱ्यांना होती. मात्र, गेल्या आठवड्यात कोल्हापुरात ह.भ.प. राणोजी महाराज (पंढरपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील दिंड्या प्रमुखांची एक बैठक झाली. या बैठकीत ठरल्यानुसार दिंडीत खंड न पडता काही अटी व शर्ती टाकून दिंड्या पंढरपूरला नेण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार येणाऱ्या दिंड्यात प्रत्येकी दहा ते पंधरा सदस्य संख्या, दिंड्यात महिलांचा अल्प सहभाग गरज भासल्यास मुक्कामाच्या ठिकाणी होणारे बदल यानुसार दिंड्यांना परवानगी देण्यात आली.
दरम्यान, राधानगरी तालुक्यातील गेल्या पस्तीस वर्षांची पायी दिंडीची परंपरा असलेली कसबा तारळे येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिरातील पायी दिंडी ह.भ.प. वसंत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. तालुक्यासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्वच दिंड्या रविवार सायंकाळी मार्केट यार्डात मुक्कामाला येणार असून, सोमवार (दि. १५) सकाळी या सर्वच दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.