जाग्यावर बसून डेंग्यूचा सर्व्हे
By Admin | Updated: November 7, 2014 23:50 IST2014-11-07T23:47:49+5:302014-11-07T23:50:44+5:30
दिलीप टिपुगडे : करवीर पंचायत समिती सभा

जाग्यावर बसून डेंग्यूचा सर्व्हे
कसबा बावडा : शिक्षक संघटनेचा दबाव टाकत काही शिक्षकांनीच प्राथमिक शिक्षणाचे वाटोळे केले, असा आरोप तानाजी आंग्रे यांनी करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत करत शिक्षकांना नोकरीच्या ठिकाणी राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती पूनम जाधव होत्या. तसेच करवीर तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. याला सर्वस्वी शिक्षकच जबाबदार आहेत असा थेट आरोप तानाजी आंग्रे, सरदार मिसाळ आणि जयसिंग काशीद यांनी केला. तालुक्यातील हे चित्र बदलायचे असेल, तर शिक्षकांना ते ज्या शाळेत आहेत तिथेच राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली. आंग्रे यांच्या प्रश्नावर दिलीप टिपुगडे यांनी आक्षेप घेत शिक्षकांना अशी सक्ती करण्यापेक्षा शाळेची गुणवत्ता कशी वाढेल याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे, असे सुचविले. तसेच सदस्यांनी एखादी शाळा दत्तक घ्यावी व त्यावर लक्ष ठेवावे, अशी सूचना केली. यावर शिक्षण अधिकारी रवींद्र चौगले व गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी पंधरा दिवसांत याबाबत तपासणी केली जाईल, असे आश्वासन दिले. सध्या सर्वत्र डेंग्यूचे रुग्ण आढळत असताना तालुक्यात या आजाराबाबत काय उपाययोजना केली, असा सवाल दत्तात्रय टिपुगडे यांनी करत प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी जाग्यावर बसून सर्व्हे करतात, असा आरोप केला. यावर डॉ. नलवडे यांनी असा कोणताही प्रकार होत नसल्याचा खुलासा केला. पंचायतमधील ४० वर्षांवरील कर्मचाऱ्यांनी तसेच सदस्यांनी आरोग्य तपासणी शिबिर लवकरच घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पहिलीपासून विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज सुरू करा, अशी मागणी स्मिता गवळी यांनी केली. जीवन प्राधिकरणावरून ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या घरगुती पाणीपुरवठा नळाना सक्तीने मीटर बसवा, अशी मागणी दिलीप टिपुगडे यांनी केली. बांधकाम विभागाच्या ९८ कामांना मंजुरी मिळाली असून, ८४ कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याचे बांधकाम विभागाचे जे. डी. यादव यांनी सांगितले. शिये ते रामानंदनगर रस्ता उखडला असल्याचे जयसिंग काशीद यांनी सांगितले. कृषी विभागाकडून योजनांची माहिती व्यवस्थित दिली जात नाही, असा आरोपही यावेळी सदस्यांकडून करण्यात आला. ३००० रुपये दराचा ठराव या सभेत उसाला किमान तीन हजार रुपये दर मिळावा असा ठराव एकमताने आणि टाळ्यांच्या गजरात करण्यात आला. लवकरच या ठरावाची प्रत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. बांधकाम, शिक्षणचे कर्मचारी धारेवर या सभेत बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, कृषी, आदी विभागांवर चर्चा झाली असली तरी सर्वाधिक चर्चा शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागावर झाली. या दोन्ही विभागांच्या कर्मचाऱ्यांना यावेळी चांगलेच धारेवर धरण्यात आले.