शहरातील डेंग्यू सर्वेक्षणात १८७१ घरांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:32+5:302021-07-03T04:16:32+5:30
कोल्हापूर : शहरात डेंग्यू, चिकुनगुनियाची साथीला आळा घालण्याच्या हेतूने महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून शुक्रवारी शहरातील आठ प्रभागांत ...

शहरातील डेंग्यू सर्वेक्षणात १८७१ घरांची तपासणी
कोल्हापूर : शहरात डेंग्यू, चिकुनगुनियाची साथीला आळा घालण्याच्या हेतूने महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून शुक्रवारी शहरातील आठ प्रभागांत १८७१ नागरिकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्याठिकाणी औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात आली, तसेच डास अळी कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण शहर परिसरात सर्वेक्षण करण्यात येत आहे. शुक्रवारी शहरात आरोग्य विभागामार्फत आठ प्रभागांत सर्वेक्षण करण्यात आले. तेथील १८७१ घरात जाऊन घरातील ३७५२ कंटेनरचे तपासणी करण्यात आली. त्यावेळी डेंग्यूसदृश १३६ ठिकाणी डास अळी शोधून काढल्या. दूषित पाणी आढळलेल्या १३६ ठिकाणी औषध फवारणी, धुर फवारणी करण्यात आली.
सर्वेक्षणादरम्यान दूषित पाण्याच्या ठिकाणी असलेल्या टायरी जप्त करून पाण्याच्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, सर्व वॉर्ड आरोग्य निरीक्षक, मुकादम व कर्मचारी उपस्थित होते.
६३ प्रभागांत १७ हजार ५५२ घरात तपासणी -
शहरात २३ जूनपासून ही मोहीम हाती घेण्यात आली असून तेव्हापासून २ जुलैअखेर ६३ प्रभागांमधील १७ हजार ५५२ घरांचे सर्वेक्षण झाले.
यामध्ये ३० हजार २८५ कंटेनरची तपासणी केली असता डेंग्यूसदृश ५७४ ठिकाणी डास अळी आढळून आल्या असून डेंग्यूसदृश २७ रुग्ण आढळून आले आहेत.