गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावरील अवैध बांधकाम पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:58 IST2020-12-05T04:58:50+5:302020-12-05T04:58:50+5:30
गांधीनगर : गांधीनगर येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई केली. उचगाव हद्दीतील मुख्य रस्त्याच्या लगत सुरू ...

गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावरील अवैध बांधकाम पाडले
गांधीनगर : गांधीनगर येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई केली. उचगाव हद्दीतील मुख्य रस्त्याच्या लगत सुरू असणारे बांधकाम शुक्रवारी सकाळी पाडण्यात आले. व्यापारी पेठेच्या मुख्य रस्त्यावर अनेकजणांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी, वाहतुकीची मोठी कोंडी सतत होत असते. या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. शुक्रवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्य रस्त्यालगत सुरू असणारे विजय जसवानी यांचे बांधकाम पाडून टाकले. यावेळी काही व्यापाऱ्यांनी याला विरोध केला. मात्र, बांधकाम विभागाने आपली कारवाई सुरूच ठेवली. ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी इंगवले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी या कारवाईवेळी पोलीस बंदोबस्त दिला होता. यावेळी शिवाजी इंगवले यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून मुख्य रस्त्यालगत जी नवीन बांधकामे बांधण्यात येतील त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे कुणीही अवैध बांधकामे करू नयेत.
फोटो ओळ ०४ गांधीनगर बांधकाम
गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावरील उचगाव हद्दीतील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करीत काढून टाकले.( छाया : अनिल निगडे)