लोकशाही भांडवलदारांचे बाहुल

By Admin | Updated: December 9, 2014 00:31 IST2014-12-09T00:10:14+5:302014-12-09T00:31:03+5:30

अवि पानसरे व्याख्यानमाला

Democracy capitalists | लोकशाही भांडवलदारांचे बाहुल

लोकशाही भांडवलदारांचे बाहुल

कोल्हापूर : जागतिकीकरणानंतर भांडवलदारांचे राजकीय व्यवस्थेवरील नियंत्रण वाढले आहे़ त्यामुळे लोकशाही भांडवलदारांच्या हातातील बाहुले बनली असून राज्यसंस्थेची धोरणे ही गोरगरीब जनतेपेक्षा भांडवलदारांना पूरक ठरत आहेत़ परिणामी त्यांचा राजकारणातील हस्तक्षेप वाढला आहे़ या पार्श्वभूमीवर लोकशाही प्रबळ करण्यासाठी केवळ निवडणूक म्हणजे लोकशाही हा समज खोडून घटनेतील तत्त्वाप्रमाणे लोकशाहीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ़ अरुणा पेंडसे यांनी केले़
श्रमिक प्रतिष्ठानतर्फे येथील शाहू स्मारक भवनात आयोजित कॉम्रेड अवि पानसरे व्याखानमालेत ‘भांडवल व भारतीय लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रा़ आशा कुकडे होत्या़
डॉ़ पेंडसे म्हणाल्या, राजकारणी आश्वासने पाळत नाहीत, कारण त्यांचे धोरण भांडवलधार्जिणे असते़ स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही स्थिती कायम आहे. पण जागतिकीकरणानंतर भांडवलदारांचा राजकीय व्यवस्थेवर दबाव वाढला आहे़ त्यांना सर्वसामान्य जनतेच्या कल्याणापेक्षा आपले हितच महत्त्वाचे वाटत असल्यामुळे त्यांना लोकशाहीशी काही देणे-घेणे नाही़ त्यांना कोणतीही शाही चालते़़़ भले मग ती हुकुमशाहीही असो!़ या प्रक्रियेत मध्यमवर्गालाही कॅप्चर करण्यात भांडवलदार यशस्वी झाले आहेत़
डॉ़ पेंडसे म्हणाल्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी, जमीन संपादन कायद्याला भांडवलदारांनी विरोध केला़ केंद्रातील सरकार तर भांडवलदारांचे सरकार असल्याप्रमाणे आपली धोरणे राबवित आहे़ गृहनिर्माण, भूसंपादन करताना भांडवलदारांना अनुकुल असेच धोरण राबविले जात असून आदिवासी, गोरगरीब व कामगारांचे हक्क डावलले आहेत़ खनिज उत्खननासाठी तिथल्या आदिवासींना स्थलांतरण करण्यास भाग पाडले जात असून लोकशाहीच्या आडून लोकशाहीच बदलण्याचे हे कारस्थान आहे़
लोकांच्या एकत्रिकरणाची प्रक्रिया रोखण्यासाठी उत्पादनांचे विकेंद्रीकरण करून कामगारांना संघटन करण्यापासून दूर ठेवले जात आहे़ या बाबी डोळसपणे तपासल्या पाहिजेत, असे पेंडसे यांनी सांगितले.
सध्या लोकशाही पैशांवर चालत असल्याची खंत व्यक्त करुन प्रा़ कुकडे म्हणाल्या, अदानींनी भाजपला लोकसभा निवडणुकीत प्रचंड पैसा पुरविला़ आता मोदी त्यांचे ऋण फेडत आहेत़ पंतप्रधान मोदी साध्वीच्या ‘अपशब्दा’चे समर्थन करीत आहेत. घटनेतील समाजवाद, धर्मनिरपेक्षता व समतेच्या तत्त्वांच्या प्रचारासाठी लोकचळवळ उभारणे आवश्यक आहे़

Web Title: Democracy capitalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.