केंद्रीय पोलीस भरतीत वयाची अट शिथिल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:02+5:302021-07-18T04:18:02+5:30
जहागीर शेख : कागल : कोरोना महामारीमुळे गेली वर्षाहून अधिक काळ देशभरात लाॅकडाऊन चालू-बंद होत आहे. या काळात विविध ...

केंद्रीय पोलीस भरतीत वयाची अट शिथिल करण्याची मागणी
जहागीर शेख :
कागल : कोरोना महामारीमुळे गेली वर्षाहून अधिक काळ देशभरात लाॅकडाऊन चालू-बंद होत आहे. या काळात विविध शासकीय नोकर भरती प्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर केंद्रीय कर्मचारी निवड आयोगाने २५ हजार हून अधिक जागांसाठी जी.डी. काॅन्स्टेबल भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. कोरोना महामारीत वाया गेलेल्या वयाचा विचार करून वयोमर्यादा एक ते दोन वर्षानी शिथिल करावी अशी मागणी होत आहे.
सीमा सुरक्षा दल, केद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राखीव पोलीस दल, इंडो तिबेट पोलीस दल अशा विविध दलासाठी ही मेगा भरती जाहीर झाली आहे. या भरतीची तयारी करणारे युवक गेल्या वर्षभरापासून जाहिरात निघण्याची वाट पाहत होते. आयोगाने दोन ते तीन वेळा जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखाही जाहीर केल्या होत्या. पण कोरोना महामारीमुळे ही भरती प्रक्रिया राबविणे शक्य होणार नाही. लेखी व मैदानी परीक्षा घेता येणार नाही. म्हणून या तारखा पुढे ढकलल्या आहेत. आता १७ जुलै २०२१ पासून ही प्रक्रिया सुरू केली आहे. ३१ ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे. म्हणून कोरोना महामारीचा संदर्भ घेऊन या भरतीसाठी वयाची अट वर्ष दोन वर्षासाठी शिथिल करावी, अशी भावना व्यक्त होत आहे.
चौकट
सध्याची वयाची अट
सध्या भरतीसाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत सर्वसाधारण वर्गासाठी २३ वर्षे तर मागासवर्गीय वर्गासाठी पाच वर्षे म्हणजे २८ वर्षे आणि ओबीसीसाठी तीन वर्षे म्हणजे २६ वर्षे अशी कमाल वयाची अट आहे. ही अट अनुक्रमे २५, ३०, २८ वर्षे करावी. म्हणजे कोरोनामुळे प्रक्रिया पुढे गेली असली तरी या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना एक संधी मिळेल.
● ‘‘गेली तीन-चार वर्षे आम्ही जी.डी. काॅन्स्टेबल भरतीची तयारी करीत आहोत. राज्य पातळीवरील विविध भरतीमध्ये वयात सवलती आहेत. पण केंद्र सरकारच्या भरतीमध्ये ही सवलत कमी आहे. कोरोना साथीमुळे सर्व देशच वर्षभरासाठी लाॅकडाऊन झाला आहे. म्हणून किमान एक वर्ष तरी वयात सवलत दिली पाहिजे. याचा लाभ देशभरातील युवकांना होईल. - संतोष पाटील गोकूळ शिरगाव (कोल्हापूर)