सरकारी कामात अडथळा आणून पैशांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:26 IST2021-04-28T04:26:14+5:302021-04-28T04:26:14+5:30
मलकापूर : येळाणे (ता. शाहूवाडी) येथे ग्रामपंचायतीच्या कामात अडथळा आणून अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना बदनामीची भीती दाखवत पैशांची मागणी ...

सरकारी कामात अडथळा आणून पैशांची मागणी
मलकापूर : येळाणे (ता. शाहूवाडी) येथे ग्रामपंचायतीच्या कामात अडथळा आणून अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना बदनामीची भीती दाखवत पैशांची मागणी करणाऱ्या सुरेश जगन्नाथ खोत यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार येळाणे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मधुकर पाटील यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात केली आहे.
पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, येळाणे ते कोपार्डे रस्त्यावरील काही झाडांचे ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित खात्यांची रितसर परवानगी घेत या फांद्या तोडून सार्वजनिक बांधकाम विभागात लाकूड जमा केले आहे.
सुरेश जगन्नाथ खोत याने तोडलेल्या फांद्यांचे छायाचित्रण केले. त्याद्वारे खोत हा संबंधित कार्यालयप्रमुख व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना बेकायदेशीर वृक्षतोड केल्याची वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत आहे तसेच वारंवार फोन करून मानसिक त्रास देत असल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. खोतविरोधात दरोडा, महिलेचा विनयभंग, सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे तक्रारीत नमूद करून खोत याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा .