अंगणवाडी टाळेप्रकरणी चौकशीची मागणी
By Admin | Updated: July 8, 2015 00:01 IST2015-07-08T00:01:06+5:302015-07-08T00:01:06+5:30
आठ-दहा बालकांचीच शाळेला हजेरी

अंगणवाडी टाळेप्रकरणी चौकशीची मागणी
नेसरी : सरोळी (ता. गडहिंग्लज) येथे शनिवारी (दि. ४) अंगणवाडी शाळा इमारतीस उपसरपंचांनी लावलेल्या कुलूपप्रकरणी अंगणवाडी सेविका मंगला पाटील यांनी पंचायत समिती कार्यालयाकडे निवेदन देऊन झाल्या प्रकाराची चौकशी करावी व आपल्याला न्याय मिळावा, अशी विनंती केली आहे. दरम्यान, याबाबत अंगणवाडी पर्यवेक्षिका कुमुदिनी देसाई यांनीही या प्रकाराचा लेखी अहवाल वरिष्ठांना कळविला आहे, तर सरोळी ग्रामस्थ व पालकांमध्ये चिमुरड्यांना होणाऱ्या नाहक त्रासाबद्दल विचारणा होत आहे.शनिवारी उपसरपंच मनोहर सुतार यांनी अंगणवाडी क्रमांक २७१ येथे जाऊन सकाळची शाळा सुरू असताना अंगणवाडी सेविका, मदतनीस व चिमुरड्यांना बाहेर काढून शाळेला कुलूप लावण्याचा प्रकार केला होता. शनिवारी सकाळची शाळा त्यांनी ग्रामपंचायत व्हरांड्यात भरवली होती. रविवारी सुटीचा दिवस असल्याने गावात या प्रकारची केवळ चर्चा सुरू होती. मात्र, ‘लोकमत’ने प्रत्यक्ष जाऊन या धक्कादायक प्रकाराची माहिती घेतली. त्यानुसार ‘लोकमत’मध्ये ‘सरोळीत अंगणवाडीला टाळे’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली. बालमनावर जेथे संस्कार केले जातात आणि त्यांच्यासमोरच स्थानिक राजकारणातून हा प्रकार घडल्याने बालमनावर काय परिणाम होईल याची जराही तमा न बाळगल्याची खंत ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. (वार्ताहर)
आठ-दहा बालकांचीच शाळेला हजेरी
गेले दोन दिवस अंगणवाडीमधील २२ पैकी ८-१० बालकांनीच हजेरी लावली आहे. मात्र, इतर बालके शाळेला गेली की नाही, का दुसऱ्या अंगणवाडीत दाखल झाली. याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती मागवावी किंवा बालके घरी असल्यास ती शाळेला येण्यास का नकार देत आहेत, याचीही माहिती घेणे गरजेचे आहे.
सरोळीतील अंगणवाडी इमारतीमधील चिमुरड्यांसह सेविका व मदतनीस यांना बाहेर काढून कुलूप लावण्याचा प्रकार हा गैरसमजातून घडला आहे. संबंधित प्रकाराबाबत माहिती व अहवाल प्राप्त झाला असून या प्रकाराची कल्पना पं. स. सभापतींना दिली आहे. गेले दोन दिवस शाळा अंगणवाडी इमारतीमध्ये भरत आहे.
- पी. बी. जगदाळे, सहा. गटविकास अधिकारी, पं. स. गडहिंग्लज