ड्रेनेजलाईनची मागणी आजही कायम
By Admin | Updated: March 13, 2015 23:55 IST2015-03-13T23:17:22+5:302015-03-13T23:55:43+5:30
नागरिकांमध्ये समाधान : मूलभूत समस्यांची काही प्रमाणात सोडवणूक

ड्रेनेजलाईनची मागणी आजही कायम
चांगले रस्ते, वेळेवर पाणी, कचरा उठाव अन् नगरसेवकांचा दांडगा संपर्क असलेला प्रभाग म्हणजे बापट कॅम्प (क्रमांक १४). असे असले तरी शासकीय अनास्थेमुळे बापट कॅम्प परिसरात ड्रेनेजलाईन नाही. तसेच गेल्या काही वर्षांपासून हा प्रश्न ‘जैसे थे’ पडून राहिला आहे. त्याचबरोबर याच प्रभागात दुसऱ्या भागाला असणाऱ्या मार्केट यार्डच्या पिछाडीस असलेल्या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. एकंदरीत, मूलभूत सुविधांबाबत हा प्रभाग समाधानकारक आहे. लोकप्रतिनिधीच्या कामगिरीबाबत देखील समाधानाची भावना नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
या प्रभागात यापूर्वीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये इतर ठिकाणी वास्तव्यास असलेल्यांनी बापट कॅम्प भागाचे प्रतिनिधित्व केले आहे. आजपर्यंत राजेंद्र डकरे, मीनाक्षी काटकर, संगीता काटकर, आदींनी या भागाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१० मध्ये कुंभार समाजाने आपलाच प्रतिनिधी उभा केला. या प्रभागात विशेषत: कुंभार समाजाचे सुमारे दीड हजार मतदान आहे. या मतदानाच्या जोरावर प्रकाश कुंभार हे निवडून आले. त्यांनी साडेचार वर्षांत दिलेली आश्वासने पाळून अनेक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. शहरातील विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कुंभार समाजाचे एकाच ठिकाणी स्थलांतर केले. त्यामुळे येथील वस्ती नव्याने निर्माण झाली. अद्यापही याठिकाणी महापालिका प्रशासनाने ड्रेनेजलाईन टाकलेली नाही. अजूनही सेफ्टी टँक घरोघरी असून लोकप्रतिनिधी सातत्याने ड्रेनेजसाठी प्रयत्न करीत आहेत. येत्या काही दिवसांत ड्रेनेजलाईन होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
दुसरीकडे, लोणार मळा, लोहार मळा, राजीव गांधी वसाहत हा नागरी वस्तीचा भाग आहे. याठिकाणी मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तरीही, याठिकाणी लोकप्रतिनिधींकडून मूलभूत प्रश्नांची सोडवणूक झाली असून, विकासकामात दुजाभाव केलेला नाही, हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
उर्वरित सात महिन्यांत प्रभागात प्रलंबित सुमारे ५० लाखांची कामे करणार आहे. त्याचबरोबर ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
- प्रकाश कुंभार-सरवडेकर, नगरसेवक