सोलापूर-रत्नागिरी चौपदरीकरण थांबवण्याची मुख्य सचिवांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:41+5:302021-09-09T04:30:41+5:30
काेल्हापूर : सोलापूर ते रत्नागिरी चौपदरीकरणामुळे शिये परिसरातील अनेक शेतकऱ्यांची कुटुंबे उद्ध्वस्त होणार असून, हे काम त्वरित थांबवावे, अशी ...

सोलापूर-रत्नागिरी चौपदरीकरण थांबवण्याची मुख्य सचिवांकडे मागणी
काेल्हापूर : सोलापूर ते रत्नागिरी चौपदरीकरणामुळे शिये परिसरातील अनेक शेतकऱ्यांची कुटुंबे उद्ध्वस्त होणार असून, हे काम त्वरित थांबवावे, अशी मागणी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी राज्याचे बांधकाम विभागाचे मुख्य सचिव गायकवाड यांच्याकडे बुधवारी केली.
प्रस्थापित चौपदरीकरणासाठी नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने करवीर मतदारसंघातील पडवळवाडी, केर्ले, केर्ली, कुशिरे, निगवे दुमाला, भुये, भुयेवाडी, जठारवाडी, शिये आदी गावातून निश्चित केला आहे.
या गावांमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस पीक घेतात. यापैकी काही गावांमध्ये औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे विविध रोजगाराच्या संधीमुळे या परिसरातील लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या रस्त्याकरिता जमिनी संपादन करण्याच्या नोटिसा प्रसिद्ध झाल्या असून, यामध्ये किमान ४०० ते ५०० शेतकऱ्यांची जवळजवळ ३०० एकर सुपीक जमीन संपादित होणार आहे. यातील बहुतांशी शेतकरी हे अल्पभूधारक असल्याने ते भूमिहीन होणार असून पडवळवाडी ते शिये हा रस्ता रद्द करा व यासाठी पर्यायी मार्ग शोधावा म्हणून राज्य शासनाने केंद्र शासनाला योग्य ती माहिती कळवावी, अशी मागणी चंद्रदीप नरके यांनी केली. हा राष्ट्रीय महामार्ग फायद्याचा नसल्याने शेतकऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात होणारी मोजणीसुद्धा बंद पाडली आहे. या महामार्गासाठी पर्यायी असा व सध्या बोरपाडळे, कोडोली, वारणानगर, वाठार ते हातकणंगले असा शंभर फुटी राज्य मार्ग अस्तित्वात असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोध असल्याने पर्यायी मार्गाचा विचार
या महामार्गाला ग्रामस्थांचा विरोध असेल तर पर्यायी मार्गाचा विचार केला जाईल. शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर करून केंद्र सरकारकडे याबाबत योग्य तो पाठपुरावा करू, अशी ग्वाही मुख्य सचिव गायकवाड यांनी दिली.
फोटो ओळी : सोलापूर-रत्नागिरी चौपदरीकरण थांबवण्याची मागणी चंद्रदीप नरके यांनी बांधकाम विभागाचे मुख्य सचिव गायकवाड यांना मुंबईत दिले. (फोटो-०८०९२०२१-कोल-चंद्रदीप नरके)