‘मातोश्री’चा ५० हून अधिक गावांना लाभ लोकसंख्येचा निकष : ग्रा.पं. इमारती टप्प्याटप्प्याने बांधणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:02 IST2018-01-23T00:01:32+5:302018-01-23T00:02:41+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर केलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंंचायत बांधणी योजनेचा कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हून अधिक गावांना लाभ होणार आहे.

‘मातोश्री’चा ५० हून अधिक गावांना लाभ लोकसंख्येचा निकष : ग्रा.पं. इमारती टप्प्याटप्प्याने बांधणार
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर केलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंंचायत बांधणी योजनेचा कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हून अधिक गावांना लाभ होणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींच्या इमारती टप्प्याटप्प्याने बांधण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात कोल्हापूर जिल्ह्यातील ८० गावांना ग्रामपंचायतींच्या इमारती नाहीत. मात्र, यामध्ये दोन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाºया ग्रामपंचायतींचा समावेश राहणार नाही.
स्वतंत्र कार्यालयीन इमारत नसलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींसाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ लोकसंख्येने लहान, आर्थिकदृष्ट्या कमकुवत अथवा दुर्गम भागातील सुमारे ४ हजार २५२ ग्रामपंचायतींना मिळणार आहे.
या योजनेनुसार स्वतंत्र इमारत नसलेल्या १००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १२ लाख आणि १००० ते २००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे.
या निधीपैकी ९० टक्के रक्कम राज्य शासनामार्फत मिळणार असून, १० टक्के रक्कम स्वनिधीतून उभारणे आवश्यक आहे.या ग्रामपंचायतींना सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावरही इमारत उभारता येणार आहे. तसेच २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना स्वनिधीतून अथवा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर इमारत उभारता येईल. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील खालील गावांच्या ग्रामपंचायतींना इमारत नसल्याने यातील लोकसंख्येच्या निकषांचा विचार करून या योजनेसाठी शिफारस करता येणे शक्य बनणार आहे.
ग्रामपंचायतींना कार्यालय नसलेली गावे
पन्हाळा - आवळी, उंड्री, बाळोली, हरपवडे, तिरपण
गगनबावडा- मार्गेवाडी, जर्गी, लोंघे, तिसंगी, खोकुर्ले
चंदगड- कळसगादे, उत्साळी, पुंद्रा, नागनवाडी, नागवे, शिरगाव, कडलगे, होसूल
गडहिंग्लज- नरेवाडी, तुपूरवाडी, कसबा नूल, इदरगुच्ची, शिप्पूर, आजरा
करवीर- आडूर, पडवळवाडी, कांचनवाडी, कंदलगाव, कळंबे तर्फ कळे, भुये
कागल- शंकरवाडी, पिराचीवाडी, कसबा सांगाव, यमगे, हमीदवाडा, अर्जुनवाडा, शिंदेवाडी, नंद्याळ, बेनिक्रे,
हातकणंगले- अतिग्रे, संभापूर, कुंभोज
राधानगरी- धामोड, मजरे कासारवाडा, बुजवडे, मौजे कासारवाडा, ढेंगेवाडी, रामनवाडी, तारळे खुर्द, तळगाव, कुडुुत्री, सावर्दे वडाचीवाडी, तरसंबळे, कौलव
भुदरगड- मडूर, गारगोटी, बामणे, पडखंबे, पाळ्याचा हुडा, चांदमवाडी, शिवडाव, शिंदेवाडी, न्हाव्याचीवाडी, मिणचे बुद्रुक
आजरा- आवंडी, शेळप, पेद्रेवाडी
शाहूवाडी- गेळवडे, शेंबवणे, परखंदळे, गोंडोली, खेडे, करुंगळे, कासार्डे, निळे, टेकोली, वरेवाडी, तुरुकवाडी, सावे, विरळे, मांजरे.