हद्दवाढीचा आतापर्यंत पाठवला सहा वेळा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:04 IST2021-01-13T05:04:47+5:302021-01-13T05:04:47+5:30
कोल्हापूर : गेल्या ७४ वर्षात शहराची सात पटीने लोकसंख्या वाढली असून हद्द मात्र तेवढीच आहे. हद्दवाढीसाठी शासनाकडे आजपर्यंत सहा ...

हद्दवाढीचा आतापर्यंत पाठवला सहा वेळा प्रस्ताव
कोल्हापूर : गेल्या ७४ वर्षात शहराची सात पटीने लोकसंख्या वाढली असून हद्द मात्र तेवढीच आहे. हद्दवाढीसाठी शासनाकडे आजपर्यंत सहा वेळा प्रस्ताव पाठविले आहेत. त्यावेळच्या प्रत्येक राज्यकर्त्यांकडून शहरवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्यापलीकडे काहीच केलेले नाही. आता सातव्यांदा फेरप्रस्ताव देण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. प्रस्तावाच्या पुढे या विषयाची गाडी सरकली नसल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव देण्याची सूचना केल्याने प्राधिकरणामुळे थांबलेला हद्दवाढीचा विषय पुन्हा चर्चेत आला. सर्वपक्षीय हद्दवाढ समर्थक कृती समितीही ‘सक्रिय’ झाली. आतापर्यंत सहा वेळा प्रस्ताव पाठवून ठोस निर्णय झालेला नाही. यामध्ये काही प्रस्ताव फेटाळले. काहीत त्रुटी असल्याचे कारण पुढे केले. ११ जून २०१५ ला १८ गावे आणि दोन एमआयडीसी असा २० गावांचा अखेरचा प्रस्ताव पाठविला आहे. आता नव्याने फेरप्रस्ताव पाठविल्यानंतर यावर निर्णय होणार की पुन्हा हद्दवाढीचे घोंघडे भिजत राहणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
चौकट
आतापर्यंत पाठविलेले प्रस्ताव
प्रस्ताव क्रमांक ०१ : २४ जुलै १९९०
प्रस्ताव क्रमांक ०२ : २४ जानेवारी २००२
प्रस्ताव क्रमांक ०३ : ११ जुलै २००९
प्रस्ताव क्रमांक ०४ : १८ मार्च २०१०
प्रस्ताव क्रमांक ०५ : २४ जुन २०१४
प्रस्ताव क्रमांक ०६: ११ जुन २०१५
चौकट
एकमेव शहर
शहराची १८७१ ते १९४६ दरम्यान हद्दवाढ झाल्याची नोंद आहे. यानंतर आजपर्यंत हद्दवाढ झालेली नाही. बहुदा ७४ वर्षात एक इंचही हद्दवाढ झाली नसलेले कोल्हापूर शहर हे राज्यातीलच नव्हे तर देशातील एकमेव शहर असावे.
चौकट
वर्ष क्षेत्र लोकसंख्या
१८७१ : ९ चौरस किलोमीटर : ३७ हजार ६६२
१९४१ : १७ चौरस किलोमीटर : ९२ हजार १२२
१९४६ : ६६. ८२ चौरस किलोमीटर : १ लाख
२०२१ : ६६.८२ चौरस किलमोटीर : सुमारे ६ लाख
चौकट
हद्दवाढी संदर्भात १७ जून २०१६ ला जिल्हाधिकारी कार्यालयात तज्ज्ञांची द्विसदस्यीय समितीसमोर बैठक झाली. प्रस्तावित गावातील नागरिकांनी विरोध केला. प्रस्तावित गावातील तत्कालीन लोकप्रतिनिधींनीही आगामी निवडणूक डोळ्यासमोर हद्दवाढ नको, अशी भूमिका घेतली. यामुळेच प्राधिकरणाची नियुक्ती झाले हेही वास्तव आहे. यामध्ये तत्कालीन आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी हद्दवाढीच्या विरोधात तर तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर हद्दवाढीच्या बाजूने मत व्यक्त केले.
चौकट
अंतिम प्रस्तावातील गावे
शिये, वडणंगे, आंबेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नागदेववाडी, नवे बालिंगे, वाडीपीर, मोरेवाडी, पाचगाव, कळंबेतर्फे ठाणे, शिरोली, उचगाव, शिंगणापूर, गोकूळ शिरगाव, नांगाव, वळीवडे व गांधीनगर (गांधीनगर स्वतंत्र ग्रामपंचायत आहे), मुडशिंगी, शिरोली एमआयडीसी, गोकूळ शिरगाव एमआयडीसी
चौकट
कोल्हापूर नगरपालिकेची स्थापना : १२ ऑक्टोबर १८५४
कोल्हापूर महापालिकेत रूपांतर : १५ डिसेंबर १९७२
कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरणाची स्थापना : १६ ऑगस्ट २०१७