अनधिकृत डिजिटल फलक हटवणार

By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T23:26:11+5:302015-07-25T01:13:31+5:30

इचलकरंजीतील बैठकीत निर्णय : मंगळवारपासून कारवाई करणार

Deleting unauthorized digital panels | अनधिकृत डिजिटल फलक हटवणार

अनधिकृत डिजिटल फलक हटवणार

इचलकरंजी : शहरात गल्लीबोळासह प्रमुख रस्त्यांवर असलेले अनधिकृत डिजिटल फलक मंगळवार (दि. २८) पासून पोलीस बंदोबस्तामध्ये हटविण्याचा निर्णय शुक्रवारी सायंकाळी नगरपालिकेमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच विनापरवाना फलक उभारल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचेही ठरविण्यात आले.
येथील जवाहरनगरमध्ये फलक उभारण्यावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत डिजिटल फलकांविषयी निर्णय घेण्याकरिता नगरपालिका सभागृहामध्ये प्रशासन, पोलीस व विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची एक बैठक झाली. त्यावेळी जातीय तणाव निर्माण होईल, अशा फलकांना परवानगी देण्यात येऊ नये. फलक उभारणीची ठिकाणे निश्चित करावीत व परवानगी देताना मजकूर व छायाचित्रे यांची पूर्वपरवानगी घ्यावी. तसेच परवानगी घेणाऱ्याचे नाव आणि कालावधी फलकावर नमूद करण्यात यावा, अशा प्रकारच्या सूचना मांडण्यात आल्या.
बैठकीमध्ये भाजपचे शहर अध्यक्ष विलास रानडे, शिवसेना शहरप्रमुख धनाजी मोरे, दिलीप माणगावकर, प्रमोद इदाते, बजरंग लोणारी, शशिकांत कालेकर, आदींनी सूचना मांडल्या. (प्रतिनिधी)


ये रे माझ्या मागल्या....
अनधिकृत डिजिटल फलक हटविण्याबरोबरच फलकांवरील मजकूर, छायाचित्रे व अन्य महत्त्वाच्या बाबींबाबत आचारसंहिता ठरविणाऱ्या बैठका यापूर्वी नगरपालिकेमध्ये अनेकवेळा झाल्या, त्यामध्ये निर्णयही घेण्यात आले. मात्र, या निर्णयाची कधीही अंमलबजावणी झाली नाही. अशी वस्तुस्थिती असताना वारंवार बैठका घेऊन ‘ये रे माझ्या मागल्या...’ अशी शुक्रवारची बैठक ठरू नये, अशा आशयाची चर्चा बैठकीमध्ये होत होती.

Web Title: Deleting unauthorized digital panels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.