कायमचा महापूर हटवा; अन्यथा पूरग्रस्तांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST2021-08-27T04:27:45+5:302021-08-27T04:27:45+5:30
* पुराचा धोका टाळण्यासाठी शासनाला उपाययोजना सुचविणार शिरोळ : महापूर हा मानवनिर्मित आहे. महापुरामुळे शेतकरी, शेतमजूर व सामान्य जनतेचे ...

कायमचा महापूर हटवा; अन्यथा पूरग्रस्तांचे आंदोलन
* पुराचा धोका टाळण्यासाठी शासनाला उपाययोजना सुचविणार
शिरोळ : महापूर हा मानवनिर्मित आहे. महापुरामुळे शेतकरी, शेतमजूर व सामान्य जनतेचे जे नुकसान झाले याला राज्य व केंद्र सरकार जबाबदार असून, शिरोळ तालुक्यातून कायमचा महापूर हटविण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजना न झाल्यास येत्या पंधरा दिवसांनंतर तालुक्यातील जनता अन्नत्याग करणार आहे. कुरुंदवाड येथे होणाऱ्या या आंदोलनात जनावरांसह हजारो पूरग्रस्त कुटुंबे सहभागी होतील, असा इशारा ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी येथे दिला.
डॉ. मुळीक म्हणाले, महापुरामुळे शिरोळ तालुक्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या महापुराला सरकारच जबाबदार आहे. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत भौगोलिक अभ्यास होणे गरजेचे आहे. येथील पूरग्रस्त घर, शेतजमीन कधीही सोडणार नाहीत. नव्याने वाढलेली रस्त्यांची उंची हादेखील प्रश्न गंभीर आहे. नैसर्गिक पद्धतीचे ओढे, नाले खुले करण्यात येऊन पाण्याच्या प्रवाहामधील नैसर्गिक स्रोत कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. कोयना धरणातील गाळदेखील काढण्यात यावा. यासह तांत्रिक व अभ्यासपूर्ण माहिती केंद्र व राज्य सरकारला पाठविणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, पूरबाधित गावातील नागरिकांना शंभर टक्के मदत मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे.
यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, धनाजीराव जगदाळे, महादेव धनवडे, पृथ्वीराज यादव, धनाजी चुडमुंगे, अमरसिंह पाटील, पिंटू फल्ले, बाबासाहेब सावगावे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.