The delegation will meet the police superintendent of Shahu Samadhi | शाहू समाधीचे काम पोलीस बंदोबस्तात, पोलीस अधीक्षकांना भेटणार शिष्टमंडळ
शाहू समाधीचे काम पोलीस बंदोबस्तात, पोलीस अधीक्षकांना भेटणार शिष्टमंडळ

ठळक मुद्देशाहू समाधीचे काम पोलीस बंदोबस्तातपोलीस अधीक्षकांना भेटणार शिष्टमंडळ

कोल्हापूर : नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचा निर्धार महानगरपालिका पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांनी केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना भेटून पोलीस बंदोबस्त देण्याची विनंती एक-दोन दिवसांत केली जाणार आहे. समाधिस्थळाच्या सभोवती सुरू असणारे संरक्षक भिंतीचे काम सिद्धार्थनगरातील काही कार्यकर्त्यांनी थांबविले असून, चर्चेतूनही हा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ज्या राजाने संपूर्ण देशाला आपल्या कृतीतून तसेच विचारातून सर्वांगीण प्रगतीची दिशा दिली, अस्पृश्यता निवारणापासून ते समाजाच्या सर्वच क्षेत्रांत अनेक मानदंड निर्माण केले, अशा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केलेल्या इच्छापत्रानुसार त्यांची समाधी नर्सरी बागेत बांधण्यात येत आहे.

शाहू महाराजांची कृपा असल्यामुळे त्यांच्या या कामात कोणतेही आढेवेढे न घेता महापालिका प्रशासनाने स्वनिधीतून समाधीचे काम करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर निधीअभावी काम थांबणार नाही, याची हमी दिली. त्यानुसार गतीने काम सुरू झाले; परंतु सिद्धार्थनगरातील काही कार्यकर्त्यांनी हे काम थांबविले आहे. त्यामुळे गेल्या दहा-बारा दिवसांपासून संरक्षक भिंतीचे काम बंद पडले आहे.

नर्सरी बागेतील समाधिस्थळी जाण्याकरिता सिद्धार्थनगराकडील बाजूने एक स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमधील व्यायामशाळा स्थलांतरित करू नये तसेच पार्किंगची व्यवस्था सिद्धार्थनगराच्या बाजूला करू नये, अशा तीन-चार प्रमुख मागण्या तेथील कार्यकर्त्यांनी केल्या आहेत.

परंतु शाहू समाधीचे पावित्र्य तसेच संरक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असल्याने समाधिस्थळ हे चारी बाजूंनी भक्कम संरक्षक भिंती उभारून बंदिस्त केले जाणार आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूने एकच प्रवेशद्वार ठेवले जाणार आहे. तथापि सिद्धार्थनगरातील नागरिकांनी मागील बाजूला आणखी एक स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवावे, अशी मागणी करून तेथील भिंतीचे काम थांबविले आहे.

याबाबत महापौर सरिता मोरे यांनी पुढाकार घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महापौर मोरे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे काम किती दिवस बंद ठेवायचे असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर आहे. गुरुवारी सायंकाळी झालेल्या कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या बैठकीत यावर गंभीरपणे चर्चा झाली.

शाहू महाराज यांच्या समाधीचे काम असल्यामुळे त्यात कोणी आडकाठी आणून कोणीही काम थांबवू नये, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त झाली. त्यानंतर पोलीस बंदोबस्त घेऊन समाधीचे काम पूर्ण करण्याचे तसेच पोलीस बंदोबस्त देण्याविषयी पोलीस अधीक्षकांना भेटण्याचे ठरले. एक-दोन दिवसांत शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांना भेटणार आहे.

छत्रपती शाहूंच्या बाबतीत वाद नको

कोल्हापुरातील कोणतेही विकासकाम सहजासहजी पूर्णत्वास जात नाही. वादविवाद, आंदोलने यांमुळे अशा कामांना भलतीकडेच वळण लागते. नगरोत्थानची कामे, रस्ते प्रकल्प, पर्यायी शिवाजी पूल, घनकचरा व्यवस्थापन, पंचगंगा घाट सुशोभीकरण, चौकांचे सुशोभीकरण अशा अनेक कामांना त्याचा फटका बसला. दुर्दैवाने राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाच्या बाबतीतही हाच अनुभव येत आहे. पोलीस बंदोबस्त, वाद, संघर्ष अशा टप्प्यावर हा विषय जाऊ न देता एकमताने त्याचे काम पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.
 

 


Web Title: The delegation will meet the police superintendent of Shahu Samadhi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.