महायुतीचे संभाव्य उमेदवार निश्चित
By Admin | Updated: August 27, 2014 00:17 IST2014-08-27T00:17:37+5:302014-08-27T00:17:37+5:30
विधानसभेचे राजकारण : ‘स्वाभिमानी’च्या भूमिकेला महत्त्व

महायुतीचे संभाव्य उमेदवार निश्चित
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतील महायुतीचे संभाव्य उमेदवार जवळपास निश्चित झाल्याचे मानण्यात येते. शिवसेना स्वाभिमानी संघटनेला दोनच जागा देण्यावर ठाम राहिली तरच वेगळे काही घडू शकते, परंतु सध्या तरी त्यांनी ‘स्वाभिमानी’च्या दोन जागा गृहीत धरून उमेदवारांची निश्चिती केल्याचे दिसत आहे.
दहापैकी आता शिवसेनेकडे आठ जागा आहेत व भाजपकडे दोन जागा आहेत, परंतु लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट आणि महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष अशा पाच पक्षांची महायुती झाली. त्यातील रासपचे जिल्ह्यात अस्तित्व नाही. आठवले गट सक्रिय आहे, परंतु त्यांना उमेदवारी देण्याचा विचारच केलेला नाही. ‘स्वाभिमानी’ची दहापैकी कोल्हापूर उत्तर वगळता नऊ मतदारसंघांत ताकद आहे, परंतु त्यांना शिवसेना दोनपेक्षा जास्त जागा द्यायला आतातरी तयार नाही. त्यावरून या दोन पक्षांत तणातणी सुरू आहे, परंतु त्याची फारशी दखल न घेता शिवसेनेने त्यांच्या वाट्याला येणाऱ्या उमेदवारांची निश्चिती केल्याचे दिसत आहे.
शिवसेनेचे सध्या जिल्ह्यात राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके व डॉ. सुजित मिणचेकर हे आमदार आहेत. विद्यमान आमदारांना बदलण्यासारखी स्थिती नाही व तसे फारसे प्रबळ कारणही नाही. कोल्हापूर उत्तरमध्ये आमदार क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच आहेच, परंतु त्यामुळे उमेदवार बदलला जाईल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. उर्वरित सहापैकी कागलमधून संजय घाटगे व शाहूवाडीतून सत्यजित पाटील यांचीही उमेदवारी अप्रत्यक्षपणे जाहीरच केली आहे. सत्यजित पाटील यांना तर त्यांनी विजयी मिरवणुकीला येतो, असे सांगून निवडणुकीच्या कामाला लागा, असेच स्पष्ट केले आहे. राधानगरीतून प्रकाश आबिटकर यांचा शिवसेना प्रवेश झाला आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत थेट घोषणा झालेली नसली, तरी उमेदवारीबाबत काहीतरी निश्चित ‘कमिटमेंट’ झाली असल्याशिवाय ते शिवसेनेत जाण्याचे धाडस करणार नाहीत. आबिटकर यांनीही लढायचे पक्के करून तयारी सुरू केली आहे. ‘स्वाभिमानी’ची शिवसेनेबरोबर रस्सीखेच झालीच तर शाहूवाडी व राधानगरी या मतदारसंघांबाबतच होऊ शकते, परंतु शिवसेना त्याबाबत कितपत लवचिक राहते यावर या घडामोडी अवलंबून असतील. (प्रतिनिधी)