कोल्हापूरसह जिल्ह्यात मृग बरसला
By Admin | Updated: June 20, 2014 01:08 IST2014-06-20T00:56:59+5:302014-06-20T01:08:59+5:30
बळीराजा सुखावला : पावसाची दमदार सुरूवात; दिवसभर ढगाळ वातावरण

कोल्हापूरसह जिल्ह्यात मृग बरसला
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात आज, गुरुवारी पावसाने दमदार हजेरी लावली. राज्यात सर्वत्र गेल्या काही दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला असला, तरी जिल्ह्यात मात्र पावसाने काहीशी ओढ दिली होती; परंतु आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने विशेषत: शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. आजच्या पावसाने शहरवासीयांना सुखद गारव्याचा आनंद मिळाला.
मृग नक्षत्राला ८ जूनला सुरुवात झाली; परंतु या नक्षत्राने ओढ दिल्याने वेळेवर पेरण्या पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात चिंतेचे वातावरण होते. हे नक्षत्र कोरडे जाते की काय, असे वाटत असतानाच शेवटच्या चरणात आज सकाळपासून पावसाला दमदार सुरुवात झाली.
दुपारनंतर तर एकसारखा पाऊस सुरू झाला. पावसाला म्हणावा तितका जोर नसला, तरी त्यात सातत्य होते. त्यामुळे शहरवासीयांना आज आपली छत्री, रेनकोट, टोपी बाहेर काढावी लागली. सकाळी घरातून बाहेर पडताना पावसापासून बचाव करणारे कपडे सोबत न घेतलेल्या शहरवासीयांनी मात्र आज पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेतला. (प्रतिनिधी)