शाळांची घटलेली पटसंख्या चिंताजनक
By Admin | Updated: July 15, 2014 01:02 IST2014-07-15T00:20:27+5:302014-07-15T01:02:15+5:30
जयसिंगपूर नगरपालिका : पालकांची मानसिकता बदलणे गरजेचे

शाळांची घटलेली पटसंख्या चिंताजनक
संदीप बावचे -जयसिंंगपूर
शहरातील नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची घटलेली पटसंख्या हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खासगी शाळांकडे वाढलेला पालकांचा ओढा यामुळे नगरपालिका शाळेत विद्यार्थ्यांची संख्या अपुरी दिसून येत आहे. नगरपालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारत चालल्याचे चित्र जरी असले तरी या शाळेत पाल्याला घालण्यासाठी पालकांची उदासीनता दिसून येत आहे.
शहरात एकूण ३२ शाळा असून, यामध्ये नगरपालिकेच्या दहा शाळा आहेत. पहिली ते सातवी ५ व पहिली ते चौथी ५ असे वर्ग असून, उर्दू शाळेचाही यातच समावेश आहे. जयसिंगपूर शहर हे शिक्षणाचे ‘माहेर घर’ म्हणून ओळखले जाते. बालवाडीपासून पदवी महाविद्यालये, इंजिनिअरिंग, वैद्यकीय शिक्षण येथे पूर्ण करता येते.
नगरपालिकेअंतर्गत शहरात दहा शाळा असून एकूण एक हजार ६७ विद्यार्थी येथे सध्या शिक्षण घेत आहेत. शाळांप्रमाणे पटसंख्येचा विचार केल्यास किमान १५०० ते २००० विद्यार्थ्यांची गरज आहे. आजच्या स्पर्धेत आपला पाल्य टिकावा, त्याला दर्जेदार शिक्षण मिळावे, त्याची प्राथमिक तयारी उच्च दर्जाची व्हावी याकडे पालक लक्ष देत आहेत. सध्या खासगी शाळा झपाट्याने वाढल्या आहेत. या शाळेतील शिक्षणामुळे आपला मुलगा लवकर हुशार होईल, असेच पालकांना वाटत आहे. याचाच परिणाम नगरपालिका शाळांमधून दिसून येत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास नगरपालिका शाळा या नावापुरत्याच शिल्लक राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे पालिका शिक्षण मंडळाबरोबरच प्रशासन विभाग व शिक्षकांनी पुढाकार घेऊन शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.