पॉपलिन यंत्रमागधारकांचा उत्पादन कमी करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST2021-06-20T04:17:49+5:302021-06-20T04:17:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : काही वर्षांपासूनची मंदी, त्यात लॉकडाऊन यामुळे आर्थिक टंचाईत अडकून वस्त्रोद्योग डबघाईला आला आहे. त्यामुळे ...

पॉपलिन यंत्रमागधारकांचा उत्पादन कमी करण्याचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : काही वर्षांपासूनची मंदी, त्यात लॉकडाऊन यामुळे आर्थिक टंचाईत अडकून वस्त्रोद्योग डबघाईला आला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी पॉपलिन यंत्रमागधारकांनी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मालेगावच्या धर्तीवर बेमुदत बंद ठेवण्यासंदर्भात सर्वांची मते जाणून घेऊनच निर्णय घेण्यात येईल, असे सर्वानुमते ठरले.
व्यवसायातील अडचणींवर चर्चा करण्यासाठी शनिवारी बैठक घेण्यात आली. त्यामध्ये पॉपलिन कारखानदारांनी यापूर्वीच उत्पादन कमी केलेले आहे तर काही कारखानदारांना नाईलाजास्तव उत्पादन करावे लागत आहे. उत्पादन खर्चापेक्षा मीटरला दोन ते अडीच रुपये नुकसान सोसून पॉपलिन कापडाची विक्री करावी लागत आहे. या सर्वंकष गोष्टींचा विचार करुन उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर पेमेंटधारा संदर्भातही चर्चा करण्यात आली. तसेच सद्य परिस्थितीसंदर्भात मालेगाव येथील कारखानदार असोसिएशनशी संपर्क साधत माहिती जाणून घेण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडून मालेगाव येथे २२ जूनपासून यंत्रमाग बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. त्यावर शहरातील व्यवसायाची परिस्थिती पाहून आणि सर्व कारखानदारांची व्यापक बैठक घेऊन सर्वांची मते जाणून घेऊनच बेमुदत बंद संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.
या बैठकीला कैश बागवान, श्रीशैल कित्तुरे, अशोक घट्टे, नंदकुमार कांबळे, जयवंत अचलकर, आनंदा होगाडे, फिरोज जमखाने, गजानन मेटे, आयुब गजबरवाडी, सचिन सावंत, राजू राशिनकर, दिलीप ढोकळे, आदींसह कारखानदार उपस्थित होते.