पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चाचा निर्णय
By Admin | Updated: December 11, 2015 00:51 IST2015-12-11T00:34:16+5:302015-12-11T00:51:38+5:30
टोलचा प्रश्न : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन; टोलविरोधी कृती समितीचा निर्णय

पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चाचा निर्णय
कोल्हापूर : शहरातील टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले आहेच; तर आता त्याबाबतचा अध्यादेश कधी काढणार, याची विचारणा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन संपताच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय गुरुवारी येथे झालेल्या कोल्हापूर शहर, जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्याचाही निर्णय यावेळी झाला.
भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर आल्यापासून शहरातील टोल रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहे. १ डिसेंबरपूर्वी हा टोल रद्द करून तसा अध्यादेश काढला जाईल, असे आधी सांगण्यात आले; परंतु ही मुदत पुन्हा एक महिन्याने वाढविली. सध्या नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून, त्या अधिवेशनात तशी घोषणा करावी आणि अध्यादेश काढावा, अशी आठवण करून देण्यासाठी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे १६ डिसेंबरला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील होते.
विधिमंडळ अधिवेशनात कोल्हापूरच्या टोल आंदोलनाचे पडसाद त्यामध्ये उमटावेत, सभागृहात चर्चा व्हावी, म्हणून पुन्हा एकदा आंदोलन हाती घ्यावे, असा आग्रह बैठकीत धरण्यात आला. यावेळी काहींनी पुन्हा एकदा ‘कोल्हापूर बंद’ करावे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना कोल्हापूर प्रवेश बंद करावा, अशा संतप्त सूचना मांडल्या; परंतु एकदम टोकाची भूमिका न घेता संयमाने आंदोलन करू, असे ठरले. त्याचाच एक भाग म्हणून प्रथम १६ डिसेंबर रोजी धरणे धरण्याचा आणि विधिमंडळ अधिवेशन संपताच पालकमंत्री पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मोर्चाची तारीख १६ डिसेंबर रोजी निश्चित करण्यात येईल, असेही यावेळी ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)
प्रकल्पाची किंमत वस्तुस्थितीवर ठरवा
रस्तेविकासाची किंमत ही भाजी मंडईतील मालासारखी घासाघीस करून न ठरविता तत्त्वावर तसेच वस्तुस्थितीवर निश्चित करावी, असे सांगतानाच ज्येष्ठ नेते प्रा. पाटील यावेळी म्हणाले की, टोलमुक्तीचे आश्वासन सरकारने दिले आहे; त्यामुळे आकडेवारीशी तसेच रकमेशी कृती समितीचा संबंध नाही.
३१ डिसेंबरपूर्वीची मुदत कशी पाळणार, हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न
आहे.
या बैठकीत कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे, माजी महापौर आर. के. पोवार, दिलीप देसाई, अॅड. बाबा इंदूलकर, लालासाहेब गायकवाड, आदींची भाषणे झाली. जयकुमार शिंदे यांनी आभार मानले. बैठकीस दिलीप पवार, अॅड. पंडितराव सडोलीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, अशोकराव साळोखे, आदी मान्यवर उपस्थित होते.