पर्यायी शिवाजी पुलाबाबतचा निर्णय ‘केंद्रीय पुरातत्त्व’कडे

By Admin | Updated: November 22, 2015 00:37 IST2015-11-22T00:30:45+5:302015-11-22T00:37:31+5:30

चंद्रकांतदादा पाटील : सुधारित प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना

The decision to make alternative Shivaji bridge is to 'Central archaeologist' | पर्यायी शिवाजी पुलाबाबतचा निर्णय ‘केंद्रीय पुरातत्त्व’कडे

पर्यायी शिवाजी पुलाबाबतचा निर्णय ‘केंद्रीय पुरातत्त्व’कडे

कोल्हापूर : शिवाजी पुलानजीकच्या नवीन पर्यायी पुलाच्या बांधकामाला अंतिम मंजुरीबाबत केंद्रीय विभागाच्या पुरातत्त्व समितीकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय शनिवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. हा सुधारित प्रस्ताव पाठविताना ऐतिहासिक ब्रह्मपुरी टेकडी, हौद, आदी पुरातत्त्व वास्तूंचाही विचार करण्यात येणार येणार आहे.
शिवाजी पुलाशेजारीच नव्याने पर्यायी पूल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे; पण पुरातत्त्व खाते आणि पर्यावरण विभागाने आक्षेप घेतल्याने काम गेले सहा महिने थांबले आहे. त्याबाबत शनिवारी सायंकाळी महापालिका, पुरातत्त्व विभाग आणि पर्यावरण विभाग यांची एकत्रित बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी तसेच त्या-त्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ऐतिहासिक वास्तूपासून शंभर मीटरपर्यंत कोणत्याही बांधकामाला परवानगी देता येत नाही. शिवाजी पुलाशेजारील नवीन बांधकाम सुरू असलेला पर्यायी पूल हा ऐतिहासिक ब्रह्मपुरी टेकडीपासून १०० मीटर अंतराच्या आत आहे, तरीही तो बांधला आहे, अशी तक्रार कोल्हापुरातून आल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. या नव्या पुलासाठी ९० कोटी रुपये एकूण खर्च असून त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. पुलाच्या बांधकामाच्या मार्गात अडचणी येत असलेली झाडे जमिनीपर्यंत तोडण्यासाठी पर्यावरण विभागाने बैठकीत मंजुरी दिली; पण तेथील जमीन खोदताना पुरातत्त्व विभागाचा अडथळा महत्त्वाचा आहे. पुलाचे बांधकाम सुरू असताना ऐतिहासिक ब्रह्मपुरी टेकडीला कोणताही धक्का लागणार नाही. तसेच ऐतिहासिक वास्तूला कोणताही अडथळा होणार नाही, याबाबत नव्याने सुधारित प्रस्ताव तयार करून त्याचे केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे सादरीकरण करावे, अशीही सूचना यावेळी चंद्रकांतदादा यांनी मांडली. काही तांत्रिक अडचणी दूर करणारा सुधारित प्रस्ताव आपल्याकडे पाठविल्यास त्याचा अभ्यास करून मंजुरीबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे एम. माधवन यांनी यावेळी दिले. या सुधारित प्रस्तावाबाबत केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे मंत्री महेश शर्मा यांची भेट घेऊन चर्चा करू, असेही आश्वासन खासदार महाडिक यांनी यावेळी दिले.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. आफळे, कार्यकारी अभियंता आर. के. बामणे, उपअभियंता अभय अवटे, मुनगंटी, महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आदी अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नव्या पर्यायी पुलाला मंडलिक यांचे नाव
शिवाजी पुलाला पर्यायी बांधण्यात आलेल्या या नव्या पुलाला दिवंगत नेते, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे नाव देण्याचा प्रस्ताव खासदार धनंजय महाडिक यांनी दिला. तो प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून त्याला अंतिम मंजुरी घेणार असल्याचेही महाडिक यांनी सांगितले.

Web Title: The decision to make alternative Shivaji bridge is to 'Central archaeologist'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.