साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:24 IST2021-01-25T04:24:34+5:302021-01-25T04:24:34+5:30
यड्राव : महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या थकीत पगारासह स्टाफिंग पॅटर्नच्या विषयी समिती स्थापन केली आहे. तसेच त्रिपक्षीय समितीही पगारवाढीसाठी ...

साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय लवकरच
यड्राव : महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या थकीत पगारासह स्टाफिंग पॅटर्नच्या विषयी समिती स्थापन केली आहे. तसेच त्रिपक्षीय समितीही पगारवाढीसाठी गठित केली असून पगारवाढीचा निर्णय लवकरच होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रातिनिधिक मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिली.
साखर कामगारांच्या प्रश्नांसाठी जिल्ह्यातील साखर कारखाना कामगार संघटना व साखर कारखान्यांना शिष्टमंडळासह भेटी सुरू आहेत. यावेळी काळे यांनी ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले, शासनाला त्रिपक्षीय समिती नेमणे, थकीत पगार, स्टाफिंग पॅटर्न व बंद कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्यासाठी संपाची नोटीस दिली होती. त्यास अनुसरून जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय पक्षीय समिती नेमून पगारवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. या समितीच्या एक-दोन बैठकीत अंतिम निर्णय लवकरच होईल.
जयप्रकाश दांडेगावकर यांच्या पुढाकाराने सहकारमंत्री व कामगारमंत्री यांच्या आदेशाने साखर कामगारांच्या थकीत पगार, स्टाफिंग पॅटर्न व बंद कारखान्याबाबत शासनाने साखर आयुक्त व कामगार आयुक्त व साखर महासंघाचे कार्यकारी संचालक यांची समिती नेमून अहवाल मागितला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यावर साखर कामगारांचे सर्व प्रश्न सुटणे सोयीचे होणार आहे. या शिष्टमंडळात प्रातिनिधिक मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, सर्जेराव हळदकर, आझाद शेख, बाळू बनगे, प्रदीप शिंदे यांचा सहभाग होता.
चौकट - साखर कामगारांसाठी नव्याने येत असलेला स्टॉपिंग पॅटर्न जुन्या साखर कारखान्यांसाठी चालणार नाही व अत्याधुनिक कारखान्यांसाठी तो कसा आहे, हे अधिकारी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर आमच्या प्रतिनिधींशी चर्चा करून तोडगा निघणार आहे, असे प्रतिनिधिक मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांनी सांगितले.
फोटो - २३०१२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळी - जयसिंगपूर येथे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते तात्यासाहेब काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, सर्जेराव हळदकर, आझाद शेख, बाळू बनगे, प्रदीप शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.