थोडगे मारहाण अहवालावर दोन दिवसांत निर्णय
By Admin | Updated: August 5, 2014 00:31 IST2014-08-05T00:21:48+5:302014-08-05T00:31:56+5:30
पोलीस अधीक्षक शर्मा यांची माहिती

थोडगे मारहाण अहवालावर दोन दिवसांत निर्णय
कोल्हापूर : बंकट थोडगे मारहाण प्रकरणाचा चौकशी अहवाल अद्याप माझ्याकडे आलेला नाही. दोन दिवसांत तो सादर होईल. त्यानंतर अहवालात काही तथ्य आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक
डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी आज, सोमवारी दिली.
गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती आणि सामाजिक कार्यकर्ते बंकट थोडगे यांना करवीर पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा चौकशी अहवाल पोलीस उपअधीक्षक किसन गवळी यांनी शनिवारी आवक-जावक (टपाल) विभागाकडे सादर केला आहे. तो अहवाल अद्याप डॉ. शर्मा यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही.
थोडगे हे कामानिमित्त करवीर तहसील कार्यालयाच्या आवारात आले असता एका कॉन्स्टेबलने त्यांना अरेरावी केली. त्याबाबत जाब विचारला असता चार ते पाच कॉन्स्टेबलनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यावेळी त्यांचा शर्ट फाटला. आपल्याला विनाकारण मारहाण झाली म्हणून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय थोडगे यांनी घेतला. हा प्रकार आमदार चंद्रदीप नरके यांना समजताच ते घटनास्थळी आले. यावेळी पोलिसांनी क्षमायाचना केली. त्यानंतर सामाजिक संस्थांनी हे प्रकरण चांगलेच ताणून धरले. अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडे याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार त्यांनी चौकशी अधिकारी म्हणून किसन गवळी यांची नियुक्ती केली. गवळी यांनी या संपूर्ण प्रकरणाची गोपनीय पद्धतीने चौकशी पूर्ण करून अहवाल सादर केला आहे. आता या अहवालावर डॉ. शर्मा कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)