अपात्र मुख्याध्यापकांबाबत मंत्रिमंडळात निर्णय
By Admin | Updated: July 29, 2014 23:07 IST2014-07-29T19:54:54+5:302014-07-29T23:07:59+5:30
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा : प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला ग्वाही

अपात्र मुख्याध्यापकांबाबत मंत्रिमंडळात निर्णय
हेर्ले : राज्यातील अपात्र मुख्याध्यापकांना पदावनती न देता त्यांना त्याच पदावर ठेवण्यासाठी बुधवारच्या मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने औरंगाबाद येथे भेट घेऊन विविध प्रश्नावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.तसेच शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी पूर्वी काम केलेल्या अंशकालीन निदेशकांचा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत निकालात काढून त्यांना नियुक्ती देणेबाबत आदेश काढले जातील, अशी स्पष्ट ग्वाही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिली. यामुळे राज्यातील अंशकालीन निदेशकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. या शिष्टमंडळात राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, उपनेते वसंतराव हारुगडे, दीपिका पुंडे, राज्य सरचिटणीस आप्पा कुल, राज्य कार्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, कोषाध्यक्ष अंबादास वाझे, राज्य संपर्क प्रमुख मधुकर वालतुरे, भेंडाळा शिक्षण संकुलाचे अध्यक्ष बाजीराव खारतोडे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नामदेव रेपे, सरचिटणीस बी. एस. पाटील यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)