नर्सिंग चालकांना ३१ डिसेंबरची डेडलाईन
By Admin | Updated: December 22, 2015 00:59 IST2015-12-22T00:25:47+5:302015-12-22T00:59:16+5:30
महापालिकेचे शिबिर : १६५ नर्सिंग होमच्या प्रतिनिधींची हजेरी; अपुऱ्या कागदपत्रांसाठी हमीपत्रे

नर्सिंग चालकांना ३१ डिसेंबरची डेडलाईन
कोल्हापूर : शहरातील दवाखाने, नर्सिंग होम यांना परवाने देण्याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सोमवारी घेण्यात आलेल्या शिबिरात दवाखाने, नर्सिंग होमच्या सुमारे १६५ हून अधिक प्रतिनिधींनी हजेरी लावून महापालिकेकडे विविध विभागांच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रां’सह कागदपत्रांच्या फाईल दाखल केल्या. ३१ डिसेंबरपर्यत शहरातील सर्व दवाखाने, नर्सिंग होम, हॉस्पिटल यांनी कागदपत्रांची पूर्तता करून न केल्यास कायदेशीर कारवाई होणार आहे. राजारामपुरीतील नगररचना कार्यालयात झालेल्या या शिबिरात दवाखाने, नर्सिंग होम परवान्यांबाबत पार्किंग, अग्निशमन यंत्रणा, बांधकाम नूतनीकरण आदींबाबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याची यंत्रणा ‘एकाच छताखाली’ उपलब्ध करून दिली होती. कागदपत्रांची छाननी करून ती फाईल परिपूर्ण करण्याबाबत या प्रतिनिधींकडून मुदतीचे हमीपत्र देण्यात आले.
राज्य शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार गेल्या काही महिन्यांपासून महापालिका प्रशासनाने शहरातील नर्सिंग होमचालकांना त्यांच्या नर्सिंग होमजवळ पार्किंग, अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून द्याव्यात म्हणून सूचना केल्या होत्या. मध्यवस्तीतील नर्सिंग होममध्ये येणाऱ्यांची वाहने स्त्यावर उभारत असल्याने त्याचा शहरवासीयांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता. या नर्सिंग होम, दवाखाने, कॉटेज हॉस्पिटलांना पार्किंग, अग्निशमन यंत्रणा, इमारत बांधकाम अगर नूतनीकरण परवाना, भोगवटा प्रमाणपत्रे बंधनकारक केल्याने या विविध परवान्यांसाठी संबंधित नर्सिंग होम, दवाखान्याच्या प्रतिनिधींकडून कागदपत्रांची छाननी केली. परवाना व त्या-त्या विभागांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र एकाच छताखाली’ मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या नगररचना व आरोग्य विभागाच्यावतीने सोमवारी दिवसभर शिबिर घेतले. विविध ‘ना हरकत प्रमाणपत्रा’बाबत यावेळी प्रतिनिधींनी मार्गदर्शन प्रत्येक विभागाच्या प्रमुखांकडून मार्गदर्शन घेऊन शंकांचे निरसन केले. ३१ डिसेंबरपर्यत शहरातील सर्व दवाखाने, नर्सिंग होम, कॉटेज हॉस्पिटल यांनी कागदपत्रांची पूर्तता करून न दिल्यास अगर त्याबाबत काही कालावधींचे हमीपत्र न दिल्यास संबंधित हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई होणार आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली चारही विभागांचे उपशहर अभियंते आर. के. मस्कर, एस. के. पाटील, एस. के. माने, हर्षवर्धन घाटगे, सहायक अभियंता व्ही. आर. पाटील, राजेंद्र वेल्हाळ, आर. के. जाधव, बी. एन. दबडे. आरोग्य लिपिक मुबारक मुजावर, नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांच्यासह २५ अधिकारी, कर्मचारी या शिबिरासाठी कार्यरत होते. (प्रतिनिधी)
कोल्हापूर शहरातील दवाखाने, नर्सिंग होमचालकांना विविध सुविधा देणे बंधनकारक केल्याने याबाबत विविध विभागांच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’च्या कागदपत्रांबाबत महापालिकेच्या नगररचना आणि आरोग्य विभागाच्यावतीने सोमवारी घेण्यात आलेल्या शिबिरास प्रतिसाद लाभला. या शिबिरात दवाखान्यांच्या प्रतिनिधींनी कागदपत्रांची छाननी करून घेतली.