२५ डिसेंबर ‘रंकाळा कृतज्ञता दिवस’
By Admin | Updated: December 10, 2014 23:59 IST2014-12-10T23:19:58+5:302014-12-10T23:59:28+5:30
संवर्धन व संरक्षण समिती : प्रदूषणाबाबत जागृती करण्याचा प्रयत्न

२५ डिसेंबर ‘रंकाळा कृतज्ञता दिवस’
कोल्हापूर : शहराचे आरोग्य व पर्यावरणीय समतोल सांभाळणाऱ्या रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी २५ डिसेंबर हा ‘रंकाळा कृतज्ञता दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आज, बुधवारी सकाळी परिसरातील रंकाळाप्रेमी व संघटनांची याबाबत चौपाटी परिसरातील नवनाथ मंदिर येथे बैठक झाली. त्यानुसार यंदाही दरवर्षीप्रमाणे ‘रंकाळा कृतज्ञता दिवस’ साजरा करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी रंकाळाप्रेमींतर्फे केले.
शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या रंकाळ्याची दुरवस्था रोखण्यासाठी रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीतर्फे लोकचळवळ सुरू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी (दि. २५) ‘रंकाळा कृतज्ञता दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी साडेसात वाजता शहरातील नागरिकांनी रंकाळा चौपाटी येथे जमण्याचे आवाहन समितीने केले आहे. सकाळी साडेसात वाजता रंकाळा चौपाटी येथील नवनाथ मंदिराजवळ एकत्र येऊन मुक्त व्यासपीठावर रंकाळ्याविषयी कविता, प्रदूषण मुक्तीबाबत उपाय, सूचना, तसेच तलावाबाबतच्या आठवणी व घटना, आदींचे मनोगत नागरिक उत्स्फूर्तपणे व्यक्त करणार आहेत. कोल्हापुरातील शाहीर पोवाड्याच्या माध्यमातून रंकाळ्याची व्यथा सादर करणार आहेत. रंकाळा तसेच निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी रंकाळा संवर्धन संरक्षण समिती, रंकाळा मॉर्निंग वॉकर्स ग्रुप, गुलमोहर ग्रुप, माउली योग वर्ग व हास्य क्लब, खण विहार मंडळ यांच्यासह रंकाळाप्रेमी उपस्थित होते.
सकाळी सात वाजता रंकाळाप्रेमी रंकाळ्याभोवती फेरी मारणार आहेत. या माध्यमातून शांततेच्या मार्गाने रंकाळ्याची दुरवस्था मांडण्याचा प्रयत्न करतील. सायंकाळी सुरेश शुल्क व सुनील सुतार यांच्यातर्फे उत्स्फूर्तपणे ‘स्वरनिनाद-कोल्हापूर’ व ‘शब्द सुरांच्या झुल्यावर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. तरी रंकाळाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
- यशवंत भालकर
(ज्येष्ठ दिग्दर्शक)
कोल्हापुरातील रंकाळ्याच्या प्रति प्रेम व व्यथा मांडण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘रंकाळा कृतज्ञता दिवसा’च्या नियोजनासाठी बुधवारी रंकाळ्याजवळील नवनाथ मंदिर येथे झालेल्या बैठकीत यशवंत भालकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रंकाळाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.