फसवणूक करणाऱ्यास सहा वर्षांनी अटक
By Admin | Updated: June 28, 2016 00:43 IST2016-06-28T00:29:15+5:302016-06-28T00:43:14+5:30
आरोपी गुडगावचा : पावणेतीन कोटींचा घातला होता गंडा; २०१० चे कापड विक्री प्रकरण

फसवणूक करणाऱ्यास सहा वर्षांनी अटक
इचलकरंजी : येथील कापड व्यापारी मधुकर सुरेंद्रकुमार जैन यांना सुमारे दोन कोटी ८८ लाख रुपयाला फसविल्याप्रकरणी भुपेंदरसिंग सहानी (रा. गुडगांव, हरियाणा) याला सोमवारी गावभाग पोलिसांनी दिल्लीतील तिहार जेलमधून ताब्यात घेऊन अटक केली. २०१० मध्ये ही फसवणूक झाली होती.मधुकर जैन यांचे येथील कापड मार्केटमध्ये राजलक्ष्मी सिंथेटिक्स नावाने कापड खरेदी-विक्रीची फर्म आहे. त्यामार्फत ते शहर परिसरातील यंत्रमागधारकांकडून कापड खरेदी करून दलालामार्फत व्यापाऱ्यांना विक्री करतात. सन २००६ मध्ये दिल्ली येथील दलाल कैलास मल्होत्रा यांनी कुटान्स रिटेल इंडिया लिमिटेड, गुडगाव (हरियाणा) कंपनीचे सरव्यवस्थापक भुपेंदरसिंग सहानी याची ओळख करून दिली. या ओळखीमधून सहानी यांनी जैन यांच्याकडून मार्च २००९ ते मे २००९ या कालावधीत दोन कोटी रुपये किमतीच्या कापडाची आॅर्डर दिली.
त्यातील पहिल्या टप्प्यातील ५० लाख रुपये जैन यांना मिळाले. त्यानंतर ९ आॅगस्ट २००९ ते ३० मार्च २०१० पर्यंत एक कोटी ३७ लाख ८२ हजार १३६ रुपये व एक कोटी ५३ लाख २० हजार ६६३ रुपयांचे कापड पाठविले. त्याचे बिल कंपनीने इंडियन्स ओव्हरसीज बॅँक, शाखा नवी दिल्ली या बॅँकेचे ३७ धनादेश दिले. मात्र, हे धनादेश वटलेच नाहीत. त्यानंतर सहानी यांनी कंपनीचे दुसरीकडे खाते काढण्याचे काम सुरू असल्याचे सांगून वेळ मारून नेली. त्यानंतर जैन यांचे भाऊ संतोष यांनी कंपनीचे अध्यक्ष देवेंदर पालसिंह कोहली व कंपनीचे संचालक गुरुमितसिंह साहनी यांना भेटून पैशांची मागणी केली. मात्र, तिघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे दोन कोटी ८८ लाख ९० हजार ९७० रुपयांची आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने जैन यांनी पोलिसांत धाव घेतली व तिघांविरोधात फसवणुकीची तक्रार दिली होती. त्यानुसार कारवाई करीत पोलिसांनी सोमवारी भुपेंदरसिंग सहानी याला अटक केली आहे. (वार्ताहर)