शिंगणापूरच्या अक्षयने जिंकली डेक्कन क्लिप

By Admin | Updated: November 9, 2016 01:35 IST2016-11-09T01:39:44+5:302016-11-09T01:35:53+5:30

तब्बल २५ तास १३. मि. सलग सायकलिंग

Deccan clip of Shinganapur won by Akshay | शिंगणापूरच्या अक्षयने जिंकली डेक्कन क्लिप

शिंगणापूरच्या अक्षयने जिंकली डेक्कन क्लिप

प्रकाश पाटील -- कोपार्डे
कोल्हापूरच्या पश्चिमेला अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिंगणापूर (ता. करवीर) येथील अक्षय उद्धव चौगले याने सलग २५ तास १३ मिनिट पुणे ते गोवा ही सायकलिंगमधील ६४३ कि.मी. ची डेक्कन क्लिप हँगर स्पर्धा जिंकून क्रीडाक्षेत्रातील नव्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला.
डेक्कन क्लिप हँगर स्पर्धेचा मार्ग एवढा कठीण आहे. पुणे, महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, धारवाड, अनमोड घाट, वास्को, गोवा असे ६४३ कि.मी.चे अंतर आहे. यात चार ते पाच घाट. या घाटातील ५० कि.मी. चा मार्ग तर अत्यंत खडतर व आव्हानात्मकच आहे. अक्षयने सोले गटातून ओपन विभागातून भाग घेतला होता. शनिवारी (दि. ५) पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी या स्पर्धेला प्रारंभ झाला. सलगपणे २५ तास १३ मिनिटे सायकलिंग करून गोव्यात रविवारी (दि. ६) सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी प्रथम पोहोचल्यानंतर स्पर्धेचा मानकरी म्हणून झालेला आनंद अवर्णनीय होता. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी लागणाऱ्या हायटेक्निकच्या सायकलचा प्रश्न समोर असताना मित्राने आपली लाखो रुपयंची सायकल या स्पर्धेसाठी उपलब्ध करून देऊन मोठी मदत केल्याचे अक्षय याने सांगितले.
डेक्कन क्लिप हँगर या मानाच्या स्पर्धेत अक्षय हा पहिला सायकलपटू होणारा व विजेताही ठरला आहे. या स्पर्धेत देशासह परदेशातीलही मातब्बर सायकलपटूंनी भाग घेतला होता. तरीही यात आपले कसब पणाला लावून अक्षयने ही स्पर्धा जिंकून कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा खोवला आहे.
अक्षयच्या या यशामागे मोठे कष्ट आहेत. तो दररोज शिंगणापूर ते निपाणी तवंदी घाटपर्यंत व तेथून पुन्हा शिंगणापूर असा १२५ ते १४० कि.मी.चा सायकलवरून सराव करतो. त्याचा आहारसुद्धा शाकाहारी आहे. या स्पर्धेच्या मार्गातील खंबाटकी, महाबळेश्वर, अनमोड घाट फारच परीक्षा घेणारे ठरल्याचे सांगताना आकाश कोरगाव, कपिल कोळी व अनुप परमाळे यांचे मार्गदर्शन व साह्य मोलाचे ठरल्याचेही अक्षयने यावेळी नमूद केले.



मागील वर्षी मलेशियात झालेल्या आर्यनमॅन स्पर्धेत १८२ कि.मी. सायकलिंग, जलतरण व ४२ कि़मी. धावणे अवघ्या १४ तास ३६ मि. पूर्ण करत अक्षयने प्रभावी कामगिरी केली होती.

पुणे-गोवा दरम्यान डेक्कन क्लिप हँगर या ६४३ कि़ मी. अंतराच्या स्पर्धेतील एक क्षण. अक्षयने ही स्पर्धा जिंकली.

Web Title: Deccan clip of Shinganapur won by Akshay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.