जिल्ह्यात ९२५ कोटींची कर्जमाफी
By Admin | Updated: June 25, 2017 00:20 IST2017-06-25T00:20:00+5:302017-06-25T00:20:00+5:30
आकडेवारी तयार : ९० हजार शेतकऱ्यांना पूर्ण लाभ : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत

जिल्ह्यात ९२५ कोटींची कर्जमाफी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील तब्बल १ लाख १० हजार थकबाकीदारांना सुमारे ९२५ कोटींची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. यातील दीड लाखापर्यंतचे कर्ज असलेल्या ९० हजार शेतकऱ्यांचे शंभर टक्के म्हणजेच ६२५ कोटी १८ लाखांचे कर्ज माफ होणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या जिल्ह्यातील १ लाख ४८ हजार शेतकऱ्यांनाही २५ हजार किंवा २५ टक्के मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात जून २0१६ अखेर दीड लाखावरील शेती, शेती पुरक मध्यम मुदतीचे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख १० हजार आहे. त्यांचे सुमारे ९२५ कोटींचे कर्ज थकीत आहे. जिल्हा बॅँक व जिल्ह्यातील १४ राष्ट्रीयीकृत बॅँकांमधील हे थकीत शेतकरी कर्जदार आहेत. यातील ९० हजार ४१९ शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे ६२५ कोटी १८ लाखांचे थकीत कर्ज आहे. ते शंभर टक्के माफ होणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार आहे.
(दीड लाखावरील २0 हजार शेतकऱ्यांच्या कर्जसवलतीचा आकडा ३८४ कोटींवर आहे.
त्यामुळे एकूण कर्जमाफी ९२५ कोटींच्या घरात जाते.)
३० हजार शेतकऱ्यांचे थकीत कर्ज दीड लाखापेक्षा जास्त आहे, त्यांना दीड लाखापर्यंचे कर्ज माफ होईल, पण उरलेले कर्ज थकीत राहणार असल्याने त्यांचा सात-बारा कोरा होणार नाही. जिल्ह्यात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख ४८ हजार २१२ आहे. या शेतकऱ्यांनी २0१५-१६ मध्ये शेती व शेतीपूरक मध्यम मुदतीच्या ८९९ कोटींच्या कर्जाची परतफेड केली आहे. या शेतकऱ्यांना २५ हजार किंवा २५ टक्के मदतीचा लाभ मिळणार आहे.
दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळून पुन्हा सधनतेकडे वाटचाल करण्यास शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मदत मिळणार आहे.
- पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप