मातीच्या ढिगाऱ्याखाली कामगाराचा मृत्यू
By Admin | Updated: January 16, 2015 23:45 IST2015-01-16T23:12:31+5:302015-01-16T23:45:28+5:30
इचलकरंजीतील घटना : पाईपलाईनसाठी खोदाई

मातीच्या ढिगाऱ्याखाली कामगाराचा मृत्यू
इचलकरंजी : नगरपालिकेतर्फे भुयारी गटार योजनेंतर्गत सुरू असलेल्या खुदाई कामामध्ये काम करणाऱ्या कामगाराचा मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला. भारतसिंग शेख (वय ३५, रा. सहकारनगर, मूळ गाव नांदेड) असे त्याचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नगरपालिकेने भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. तीन तेथे चर मारून पाईपलाईन टाकण्याचे काम मयत भारतसिंग व त्याचे भाऊ दीपकसिंग, किरणसिंग, प्रकाश व आकाश करीत होते.
आज, शुक्रवारी सायंकाळी सुटी करून किरण, प्रकाश व आकाश निघून गेले. त्यानंतर भारतसिंग व दीपकसिंग जाण्याच्या तयारीत होते. मात्र, पोकलॅँड मशिन चालकाने पाईप बसवून जावा, असे सांगितले. त्यामुळे दोघेजण पाईप बसविण्यासाठी चरीत उतरले. चरीतून बाहेर काढून दोन्ही बाजूला टाकलेली माती ढासळू लागली. त्यामुळे दीपकसिंग हालचाल करत वर आला. तोपर्यंत चरीच्या बाजूच्या मातीसह भारतसिंग याच्या अंगावर ढिगारा कोसळला. दीपकसिंग याने त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतसिंग गाडला गेला आणि गुदमरून त्याचा मृत्यू झाला.