‘अण्णां’च्या निधनाच्या धक्क्याने ‘अण्णाराव’ गेले

By Admin | Updated: March 7, 2015 01:03 IST2015-03-07T00:51:21+5:302015-03-07T01:03:19+5:30

हत्येचा धक्का सहन न झाल्यामुळे जगाचा निरोप

The death threat of 'Anna' has gone to the end of the day | ‘अण्णां’च्या निधनाच्या धक्क्याने ‘अण्णाराव’ गेले

‘अण्णां’च्या निधनाच्या धक्क्याने ‘अण्णाराव’ गेले

राम मगदूम / गडहिंग्लज
ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्यानेही जगाचा निरोप घेतला. आयुष्यभर अण्णांशी आणि लाल बावट्याशी निष्ठा जपलेल्या या कार्यकर्त्याचे नाव आहे कॉ. एम.आर. तथा अण्णाराव मिलके.
गडहिंग्लज तालुक्यातील नूल या स्वातंत्र्यसैनिकांच्या क्रांतिकारी खेड्यात त्यांचा जन्म झाला. कोल्हापुरात ते कॉ. एम. आर. मिलके, तर गावाकडे अण्णाराव म्हणूनच परिचित होते. १९६५ च्या सुमारास ते पोटापाण्यासाठी कोल्हापूरला गेले. उद्यमनगरातील किसान ट्रॉली कारखान्यात ४-५ वर्षे वेल्डर म्हणून काम केले. १९७० मध्ये गडमुडशिंगी येथील आर. बी. पाटील सहकारी खरेदी-विक्री संघात फोरमन म्हणून नोकरी मिळाली. त्याठिकाणी कामगारांचे पुढारीपण करत असतानाच त्यांचा पानसरे अण्णांशी संपर्क आला.
कामगारांची संघटना बांधली म्हणून संस्थेत त्यांच्यावर चोरीचा देखील आरोप झाला. बिंदू चौक माहीत नसणाऱ्या कामगारांना तो चौक दाखविला म्हणून संस्थाचालकांनी त्यांना त्रास दिला. मात्र, न डगमगता त्यांनी लाल बावटा अभिमानाने खाद्यांवर मिरविला.
सेवानिवृत्तीनंतर काही काळ त्यांनी अण्णांच्या गाडीवर चालक म्हणून काम केले. वयोमानामुळे दृष्टी कमी झाल्यामुळे चारचाकीऐवजी अण्णांना ते दुचाकीवरूनच ने-आण करायचे. त्यांचा मुलगा श्रीनिवास याने कम्युनिस्ट पक्षाच्या पणजी ते दिल्ली जनजागरण रॅलीत अण्णांच्या गाडीचे सारथ्य केले. त्यांची स्नुषा वैशाली हिने देखील काही वर्षे अण्णांच्या पक्ष कार्यालयात सेवा केली. अण्णांच्या कुटुंबाशी त्यांचे अत्यंत घरोब्याचे संबंध होते.
सहा वर्षांपूर्वीच शेतीच्या ओढीमुळे ते नूलला आले.
वडिलार्जित शेतीत त्यांनी फळझाडे लावली. आयुष्याची संध्याकाळ आनंदात घालवत असतानाच वर्षापूर्वी त्यांना अर्धांगवायू आला. अण्णांच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांनी त्यांना समजू दिली नव्हती. मात्र, वृत्तपत्रातील बातमीवरून त्यांना ही क्लेशदायक घटना समजली. त्याचा धक्का सहन न झाल्यामुळे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
‘फोरमन’मुळे ‘मॅनेजर’ला मिळाला न्याय
वयाच्या साठाव्या वर्षी सेवानिवृत्ती असतानादेखील संघाच्या व्यवस्थापनाने फोरमन मिलकेंना ५८ व्या वर्षी सक्तीने निवृत्त केले.
अण्णांनी स्वत: मिलकेंचे वकीलपत्र घालून त्यांना न्याय मिळवून दिला.
अशाचप्रकारे दडपशाहीने पदमुक्त केलेल्या मॅनेजर पाटलांनाही त्याच निकालाच्या आधारे संस्थेला पुन्हा कामावर घ्यावे लागले.
उर्वरित सेवा करून दोघेही सन्मानाने सेवानिवृत्त झाले
होते.

Web Title: The death threat of 'Anna' has gone to the end of the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.