सरदार मोमीन यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:31 IST2021-09-10T04:31:19+5:302021-09-10T04:31:19+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र लाॅन टेनिस असोसिएशनचे ज्येष्ठ संघटक सरदार बाबालाल मोमीन (वय ८७) ...

सरदार मोमीन यांचे निधन
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र लाॅन टेनिस असोसिएशनचे ज्येष्ठ संघटक सरदार बाबालाल मोमीन (वय ८७) यांचे गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सोमवार पेठेतील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ क्रीडा संघटक हरपल्याची भावना क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे. ते उत्तम टेनिसपटू, क्रिकेटपटू, बॅडमिंटनपटू होते.
गेली ५० वर्षे त्यांनी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन(केएसए)च्या विविध जबाबदाऱ्या नेटाने पार पाडल्या. महाविद्यालयीन काळात १९५८ साली त्यांनी क्रीडा क्षेत्रात एक जलदगती गोलंदाज म्हणून पाऊल टाकले. मात्र, त्यानंतर त्यांचे शाहू छत्रपती व छत्रपती घराण्याशी जवळीक निर्माण झाली. याच काळात क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर यांच्याशीही चांगले संबध निर्माण झाले. त्यानंतर आजतागायत गेली पन्नास वर्षे ते अगदी २०२० पर्यंत ते केएसएच्या विविध समितीवर कार्यरत होते. यासह महाराष्ट्र लाॅन टेनिस असोसिएशनचे सुंदर अय्यर यांच्यासह पदाधिकाऱ्यांसोबत गेली ४० वर्षे कार्यरत होते. वेस्टर्न इंडिया फुटबाॅल असोसिएशन (विफा) चेही ते काहीकाळ पदाधिकारी होते. कोल्हापूर जिल्हा बास्केटबाॅल असोसिएशनसह विविध नामांकित संस्थांसाठीही ते काम करीत होते. कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रात एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे वयाच्या ८६ वर्षांपर्यत उभे राहिले होते. स्वत: फुटबाॅलपटू नसतानाही ते फुटबाॅलच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या के.एस.ए.च्या सचिव, उपाध्यक्ष आणि २०१५ ते २०१८ या काळात ते अध्यक्ष अशा विविध पदांवर ते अखेरपर्यंत राहिले. एखाद्या तरुणालाही लाजवेल असा त्यांचा कामाचा उत्साह असायचा. अगदी गेल्या वर्षांपर्यंत ते कार्यरत होते. मात्र, कोरोनाचा काळ सुरू झाल्यानंतर त्यांनी वयोमानानुसार संस्थेतील सहभाग कमी केला होता. गुरुवारी त्यांच्या निधनाची बातमी क्रीडा क्षेत्रात समजल्यानंतर शोककळा पसरली. दुपारी बागल चौकातील दफनभूमीत त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले. या वेळी क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
लाॅन टेनिस कोल्हापुरात रुजवले
कोल्हापूरकरांचा मूळचा पिंड कुस्ती आणि फुटबाॅलचा असल्यामुळे इतर खेळांना दुय्यम स्थान दिले जात होते. अशा काळात शाहू स्टेडियममधील साठमारीमध्ये त्यांनी शाहू छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिस कोर्ट तयार केले. तेथे गेली चाळीस वर्षे ते महाराष्ट्र लाॅन टेनिस असोसिएशनच्या माध्यमातून स्थानिक ते राष्ट्रीय स्पर्धा भरविण्यासाठी कार्यरत होते. तत्कालीन स्टार टेनिसपटू रामनाथ कृष्णन, नरेश कुमार, नील फ्रेझर, जाॅन फ्रेजर, गौरव मिश्रा, अमृतराज बंधू यांचे सामने त्यांनी कोल्हापुरातील महाराणी लक्ष्मी जिमखाना येथे भरविले होते. त्यात त्यांचा पुढाकार होता.
फोटो : ०९०९२०२१-कोल-सरदार मोमीन (निधन)