देवकर पाणंदमधील एकाचा ‘स्वाइन’ने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:32 IST2018-10-04T00:32:29+5:302018-10-04T00:32:33+5:30

देवकर पाणंदमधील एकाचा ‘स्वाइन’ने मृत्यू
कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी तापाच्या आजाराने उपचारासाठी दाखल झालेल्या देवकर पाणंदमधील एकाचा उपचार सुरू असताना बुधवारी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. कैलास मनोहर पवार (वय ५७, रा. देवकर पाणंद) असे त्यांचे नाव आहे; त्यामुळे जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या २३ वर पोहोचली आहे.
देवकर पाणंदमधील कैलास पवार यांना तापाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी प्रथम शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना शनिवारी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचाराअंती त्यांचे रक्त तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असता, त्यांंना स्वाइन फ्लू या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातून बुधवारी त्यांचा मृत्यू झाला.
सध्याच्या स्थितीत कोल्हापूर शहरातील सीपीआरसह खासगी रुग्णालयांत स्वाइनच्या ५६ संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांपैकी ३८ रुग्णांना स्वाइनची लागण झाल्याचे रक्त तपासणीच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. बुधवारी सीपीआर रुग्णालयातील स्वाइन फ्लूच्या खास कक्षात १५ नवीन रुग्णांची भर पडली. त्यांपैकी आठजणांचे रक्ताचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.