मुलीचा रेबिजने मृत्यू

By Admin | Updated: February 22, 2017 21:13 IST2017-02-22T21:13:59+5:302017-02-22T21:13:59+5:30

पिसाळलेल्या मांजराच्या चाव्यात सहा वर्षाच्या मुलीचा रेबिजने अखेर दुर्दैवी मृत्यू झाला.

The death of the girl's rebus | मुलीचा रेबिजने मृत्यू

मुलीचा रेबिजने मृत्यू

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 22 : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे पिसाळलेल्या मांजराच्या चाव्यात सहा वर्षाच्या मुलीचा रेबिजने अखेर दुर्दैवी मृत्यू झाला. इक्रा झाकीर मणेर असे त्या बालिकेचे नाव आहे. इक्राच्या सहवासात आलेल्या घरातील व शाळेतील ३५ मुलांना संभाव्य धोका ओळखून बुधवारी सीपीआरमध्ये रेबिजची लस दिली. तिच्यावर वेळीच उपचार झाले असते तर ही दुर्दैवी वेळ आली नसती. तिच्या मृत्यूमुळे मणेर कुटुंबिय बिथरले आहे. 

अधिक माहिती अशी, बांबवडे येथील अवचितनगर परिसरात राहणारे झाकीर मणेर हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सहा महिन्यांपूर्वीत्यांच्या पत्नीचा आजारपणात मृत्यू झाला. त्यांना तीन मुली. इक्रा बालवाडीत शिकत होती. परिसरातील पाळीव मांजराचा भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे मांजर पिसाळले होते. पंधरा दिवसांपूर्वी त्याच मांजराने इक्राच्या हात व पायाचा चावा घेतला. मांजर चावल्याने काही होत नाही, असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर इक्रा आजोळी आजीकडे येऊन राहिली. तिच्या राहणीमानात, बोलण्यात फरक जाणवू लागला. तोंडातून लाळ गळू लागली. हातवारे करून ओरडू लागल्याने येथील नातेवाईकांनी तिला गावठी औषध दिले. त्यातून काहीच गुण आला नाही. त्यामुळे ती पुन्हा वडिलांकडे आली. बांबवडे येथील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार केले. या दरम्यानच्या कालावधीत तिने शेजारी राहणारे व शाळेत सहवासात येणाऱ्या मुलांना ओरखडे ओढले होते. तिची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिला सीपीआरमध्ये दाखल केले. याठिकाणी तिला रेबिज झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचार सुरू असतानाच शनिवारी (दि. १८) तिचा मृत्यू झाला. झाकीर मणेर यांना पत्नीपाठोपाठ मुलीच्या मृत्यू जिव्हारी लागला. येथील डॉक्टरांनी संभाव्य धोका ओळखून इक्राच्या सहवासात आलेल्या ३५ बालकांना बुधवारी सीपीआरमध्ये रेबिजची लस दिली. त्यासाठी पालक आपल्या मुलांना बांबवडेहून कोल्हापुरात घेऊन आले होते. 

या बालकांना दिली लस 

बुशरा झाकीर मणेर, गौसिया मणेर, शिफा रियाज अत्तार, मिस्बा रियाज अत्तार, अलवीरा सूरज मणेर, तमन्ना इब्राहिम मणेर, अलिया इब्राहिम मणेर, रेहान फिरोज अत्तार, अरहान अत्तार, अन्सफा रफिक अत्तार, नासीर अत्तार, समीरा सरदार मणेर, साजिदा मणेर, सुबहान मणेर, सानिया समीर शिकलगार, शाहीद शिकलगार, आयान गोलंदाज, मुस्तकिम समीर गोलंदाज, हुमेरा गोलंदाज, इरशत वाशिम शेख, रेहान अरिफ गोलंदाज, आलिया गोलंदाज, आरसलान यासीन मणेर, सुफियान यासीन मणेर, अयाज सलीम मुल्लाणी, सुफिया मुल्लाणी. 

Web Title: The death of the girl's rebus