‘त्या’ प्रियकराचा मृत्यू
By Admin | Updated: November 12, 2014 00:40 IST2014-11-12T00:37:39+5:302014-11-12T00:40:22+5:30
कसबा बावड्यातील घटना : महिलेची प्रकृतीही चिंताजनक

‘त्या’ प्रियकराचा मृत्यू
कोल्हापूर : घरगुती भांडणातून विष प्राशन केलेल्या प्रेमीयुगुलापैकी तरुणाचा आज, मंगळवारी पहाटे सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. विक्रम मोहन कोरे (वय २६, रा. चौगुले गल्ली, कसबा बावडा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या प्रेयसी महिलेची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुपारी चारच्या सुमारास कसबा बावडा येथील स्मशानभूमीमध्ये विक्रमवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.
विक्रम कोरे याने विष प्राशन केल्याने त्यापाठोपाठ त्याच्यासोबत राहणाऱ्या महिलेनेही सीपीआरमध्ये विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दोघांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना विक्रमचा आज पहाटे मृत्यू झाला. विक्रमचे वडील मोहन कोरे यांचा सरबत विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायात तो त्यांना मदत करत होता. कधी-कधी तो रिक्षाही चालवत होता. त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या त्या महिलेशी त्याचे सूत जुळले. त्यानंतर त्या महिलेने पतीला घटस्फोट देऊन ती त्याच्यासोबत राहू लागली. गेली चार वर्षे ते दोघे एकत्र राहत होते. संबंधित महिला शिरोळ कारखाना, गणेशनगर येथील आहे. काल, सोमवारी सकाळी त्यांच्यात किरकोळ वादावादी झाली. यातून विक्रमने विष प्राशन केल्यानंतर त्याला तिने सीपीआरमध्ये दाखल केले. याठिकाणी अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू असतानाच तिने शिल्लक राहिलेल्या बाटलीतील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे गोंधळ उडाला होता. आज पहाटे उपचार सुरू असताना विक्रमचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक व मित्रपरिवाराने सीपीआरमध्ये गर्दी केली होती. दुपारी चारच्या दरम्यान त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, ‘त्या’ महिलेची प्रकृती चिंताजनक असून, तिच्या सेवेला कोणीच नाही. सीपीआरचे कर्मचारीच तिची सेवा करत आहेत. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)