गडहिंग्लजमध्ये विक्रेत्यांची अतिक्रमणे हटवली
By Admin | Updated: November 19, 2015 01:13 IST2015-11-19T00:54:30+5:302015-11-19T01:13:27+5:30
पालिकेची कारवाई : १५ विक्रेत्यांवर कारवाई, माल जप्त

गडहिंग्लजमध्ये विक्रेत्यांची अतिक्रमणे हटवली
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील नगरपालिका कार्यालय आणि प्रांतकचेरीसमोरील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असणारी विविध विक्रेत्यांची अतिक्रमणे नगरपालिकेने हटवली.
दोन महिन्यांपूर्वी शहरातील मुख्य रस्त्यावर झालेल्या दोन अपघातांत दोन महिलांचा बळी गेला. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी दूर करून वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी वेळोवेळी झाली.
त्यानुसार पालिकेने ही कारवाई सुरू केली. मात्र, दिवाळीत व्यापारावर परिणाम होऊ नये म्हणून पूर्वीच्या ठिकाणी हातगाडे लावण्यास परवानगी देण्याची मागणी विक्रेत्यांनी केली. त्यामुळे कारवाई थांबवण्यात आली होती.
बुधवारी अतिक्रमण हटावची कारवाई पालिकेने सुरू केली. यामध्ये फळ विक्रेते, कापड विक्रेते, चप्पल विक्रेते यांची अतिक्रमणे हटवून त्यांचा माल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मालाची मोजदाद सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
या मोहिमेत पिरूशा इराणी, राजू कांबळे, महादेव कोड्ड, संतोष पोवार, अब्दुल बोजगर, सुनील मुळे, अशोक कोरवी, रमेश पोवार, रूपेश चौगुले, अनिल काकडे, रोहिदास साबळे, विजय हेब्बाळे, शब्बीर मुल्ला, दीपक कांबळे व सादीक शेख या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
नगरपालिकेच्या शाहू सभागृहात झालेल्या व्यापक बैठकीत शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासंदर्भात विविध स्तरातील मान्यवर व नागरिकांनी सूचना केल्या होत्या.
दरम्यान, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील फिरत्या विक्रेत्यांसह सर्व अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात प्रशासनाला सर्वाधिकार देण्यात आले. त्यानुसार पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कार्यवाही सुरू केली आहे. (प्रतिनिधी)