सूत्रधाराला पकडण्यासाठी ५ सप्टेंबरची ‘डेडलाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2016 01:27 IST2016-06-12T01:27:54+5:302016-06-12T01:27:54+5:30
पाटणकरांचा इशारा : श्रमिक मुक्ती दल आणि समविचारी संघटनांचा मेळावा

सूत्रधाराला पकडण्यासाठी ५ सप्टेंबरची ‘डेडलाईन’
कोल्हापूर : डॉ. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या खूनप्रकरणी खुन्याला आणि सूत्रधाराला शोधण्यासाठी पोलिसांनी तपास मोहिमेत वेग घेतला नसल्यानेच जनतेची ‘कोम्ब्ािंग आॅपरेशन’ मोहीम हाती घेण्याची वेळ आली आहे; पण तत्पूर्वी मुंबईत ‘सीबीआय’ने वीरेंद्र तावडे याला अटक केल्यामुळे पोलिसांना तपासाची दिशा मिळाली असून, त्याची गती आणखी वाढवावी, असे आवाहन करीत, येत्या ५ सप्टेंबरपर्यंत खरा खुनी आणि सूत्रधाराला न पकडल्यास कऱ्हाड येथे लाखोंच्या संख्येने राज्यस्तरीय मेळावा घेऊन जनतेच्या इशाऱ्याने ‘कोम्बिंग आॅपरेशन’ सुरू करणार असल्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.
श्रमिक मुक्ती दल आणि समविचारी संघटनांतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचे खुनी व सूत्रधार शोधण्याचे जनतेचे कोम्बिंग आॅपरेशन सुरू करण्याबाबत शनिवारी येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे जनतेचा निर्णायक मेळावा झाला. त्याप्रसंगी बोलताना डॉ. पाटणकर यांनी हा इशारा दिला.
तीन खून झाले. आता चौथा खून होणार, असे सनातन संस्थेचे डॉ. आठवले म्हणाल्याचे ‘सीबीआय’ने एका वृत्तपत्राला सांगितले; पण चौथा खून होणार या पार्श्वभूमीवर ‘सनातन’च्या अश्रमाची तपासणी होत नाही व मुख्यमंत्रीही गप्प का? असा प्रश्न डॉ. पाटणकर यांनी केला. चौथा खून होणार म्हटलेल्यांची गृहविभागाने चौकशी करावी. २४ मार्च रोजीच्या मोर्चाच्या इशाऱ्यानंतर समीर गायकवाडला पकडले, तर जनतेच्या ‘कोम्बिंग आॅपरेशन’च्या इशाऱ्यानंतर मुंबईत वीरेंद्र तावडेला पकडले आहे. त्यामुळे आमचे ‘कोम्बिंग आॅपरेशन’ तूर्त आम्ही थांबवतो; पण पोलिस खात्याने तपासाची गती वाढविली पाहिजे. त्यासाठी पोलिस खात्याला खरा खुनी व सूत्रधार पकडण्यासाठी ५ सप्टेंबरची डेडलाईन देण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनीही बैठकीसाठी तारीख द्यावी; अन्यथा त्याच दिवशी कऱ्हाड येथे श्रमिक मुक्ती दल आणि समविचारी संघटनांचा राज्यस्तरीय मेळावा घेऊन केव्हाही अचानक ‘कोम्बिंग आॅपरेशन’ करणार असल्याचाही इशारा पाटणकर यांनी दिला. यावेळी मोहनराव यादव, आनंदराव पाटील, ज. रा. दाभोळे, नंदकुमार गोंधळी, आदींची भाषणे झाली.