बालिंगेतील जागा मोजणीला चक्क मृत महिला हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST2021-02-05T07:08:57+5:302021-02-05T07:08:57+5:30
कोल्हापूर : शिवसेनेने मंगळवार पेठेतील पाण्याच्या खजिना येथील उपअधीक्षक भूमी-अभिलेख कार्यालयातील भ्रष्ट कारभाराचा सोमवारी भंडाफोड केला. चक्क महिलेच्या मृत्यूनंतर ...

बालिंगेतील जागा मोजणीला चक्क मृत महिला हजर
कोल्हापूर : शिवसेनेने मंगळवार पेठेतील पाण्याच्या खजिना येथील उपअधीक्षक भूमी-अभिलेख कार्यालयातील भ्रष्ट कारभाराचा सोमवारी भंडाफोड केला. चक्क महिलेच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी तिच्या नावे जागेच्या मोजणीचा अर्ज दाखल झाल्याचे त्यांनी उघडकीस आणले. विशेेष म्हणजे प्रत्यक्ष मोजणीवेळी संबंधित मयत महिलेची स्वाक्षरी म्हणून अंगठा घेतल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. येथील अधिकाऱ्यांची खरडपट्टी करण्यात आली. दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करा, केलेली मोजणी रद्द करा, अशी मागणीही करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, करवीर तालुक्यातील बालिंगा येथील रि.स.नं. ५३/२ क्षेत्रावरील सात-बारावर मालकी असणाऱ्या महिलेचे ३० डिसेंबर २०१३ ला निधन झाले आहे. असे असताना त्यांच्या नावे जागेच्या मोजणीसाठी ११ मे २०१८ ला उपअधीक्षक भूमी-अभिलेख कार्यालयाकडे अर्ज दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे त्वरित दुसऱ्याच दिवशी १२ मे रोजी मोजणीचे काम करून त्यावेळी संबंधित महिलेचा अंगठा घेतल्याची नोंद आहे.
चौकट
स्वर्गातून येऊन अंगठा केला काय
महिला मयत झाली असताना मोजणीवेळी स्वर्गातून येऊन अंगठा केला काय, असा सवाल संजय पवार आणि विजय देवणे यांनी केला. दहा दिवसांत संबंधितांवर कारवाई झाली नाही तर आंदोलन करू, असा इशाराही दिला.
चौकट
नगर भूमी-अभिलेख कार्यालयास दलालांचा विळखा
सामान्य लोकांची गुंठेवारीत फसवणूक केली जात आहे. विकसक आणि दलालांचा कार्यालयाला विळखा असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला. सहायक संचालक नगररचना यांच्या मंजुरीशिवाय ले-आउट केले असून, संबंधित अधिकारी आणि विकसकांनी यामध्ये मोठा गैरव्यवहार केला असल्याचा आरोपही करण्यात आला.
प्रतिक्रिया
शिवसेनेकडून निदर्शनात आणलेल्या या प्रकरणाची चौकशी केली जाईल. भूमी-अभिलेखचे जिल्हा अधीक्षक वसंत निकम यांच्याकडे चार दिवसांत याचा अहवाल देऊ, त्यांच्या आदेशानंतरच मोजणी, ले-आउट रद्दची पुढील कार्यवाही केली जाईल.
सुधाकर पाटील, उपअधीक्षक भूमी-अभिलेख
फोटो : ०१०२२०२१ कोल शिवसेना न्यूज वन
ओळी : कोल्हापुरातील भूमी-अभिलेख कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने भ्रष्ट कारभाराच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. संजय पवार, विजय देवणे, माजी आमदार सुरेश साळोखे, शिवाजी जाधव, सुजीत चव्हाण, हर्षल सुर्वे, शशी बीडकर, अवधूत साळोखे आदी उपस्थित होते.