एका दिवसात तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन

By Admin | Updated: October 17, 2015 00:51 IST2015-10-17T00:50:49+5:302015-10-17T00:51:36+5:30

वाहतूक कोलमडली : अंबाबाई दर्शनासाठी गर्दीचा विक्रम!

In a day, three lakh devotees took a look | एका दिवसात तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन

एका दिवसात तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त झालेल्या गर्दीचे आतापर्यंतचे सगळे उच्चांक मोडत शुक्रवारी २ लाख ९० हजार ३२० भाविकांनी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. या गर्दीमुळे दर्शन मंडप अपुरे पडून भाविकांना भरउन्हात रांगेत थांबावे लागले. केवळ मंदिराबाहेरीलच नव्हे तर शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली; तर पार्किंगच्या जागाही हाउसफुल्ल झाल्याने बाहेरुन आलेल्या भाविकांना पार्किंगसाठी शोधाशोध करावी लागत होती. मात्र, एवढ्या गर्दीतही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी १ लाख ६६ हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले होते. मात्र, शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार मंदिराच्या चारही दरवाजांवर एकूण २ लाख ९० हजार ३२० भाविकांच्या उपस्थितीची नोंद झाली आहे. यात महाद्वारमध्ये ४७ हजार ८७६, घाटी दरवाजा येथे ४३ हजार ४१९, पूर्व दरवाजा येथे पुरुष ४९ हजार ३१०, महिला ७२ हजार ४६४, विद्यापीठ गेट ७७ हजार २५१ इतकी नोंद झाली आहे.
शुक्रवार हा दिवस दुर्गेच्या उपासनेचा असल्याने पहाटे चार वाजल्यापासून मंदिरात भाविकांच्या दर्शनरांगा होत्या. सकाळी आठ वाजताच महिला भाविकांची पूर्व दरवाजातील मुख्य दर्शनरांग भवानी मंडपात गेली होती. येथेही पाच ते सहा रांगा करण्यात आल्या होत्या. एरव्ही ओस असणारी पुरुषांची दर्शनरांगही आज भरून गेली होती. पुरुषांची रांग, जोतिबा रोडमार्गे भाऊसिंगजी रोडपर्यंत आली होती. अचानक झालेल्या एवढ्या गर्दीने मंदिराचे व्यवस्थापन मात्र कोलमडले. रांगांचे नियोजन करताना पोलीस, कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांंवरही ताण आला. स्वयंसेवी व्यक्ती व संस्थांनी पिण्याच्या पाण्याची सोय केल्याने भाविकांसाठी तो मोठा दिलासा ठरला. मंदिरात कासव चौक आणि गरुड मंडप येथे मुखदर्शनाची सोय केली होती. मात्र, येथेही गर्दीवर नियंत्रण ठेवणे अवघड जात होते.
मंदिराकडे जाणाऱ्या सगळ्याच मार्गांवर प्रचंड गर्दी असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली. त्यावर पर्याय म्हणून महापालिका चौकात बॅरिकेटस लावून वाहने सोडली जात होती. शिवाजी चौक, बिंदू चौक, भवानी मंडप, महापालिका ते अगदी लक्ष्मीपुरीपर्यंत वाहतूक खोळंबली होती.
 

Web Title: In a day, three lakh devotees took a look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.