दिवसा स्नॅचिंग; रात्री लूटमार

By Admin | Updated: April 7, 2015 01:10 IST2015-04-07T00:45:57+5:302015-04-07T01:10:30+5:30

चोर झाले शिरजोर : गस्तीवरील पोलिसांचा ‘टाईमपास’ संपणार कधी ?

Day snatching; Looter in the night | दिवसा स्नॅचिंग; रात्री लूटमार

दिवसा स्नॅचिंग; रात्री लूटमार

एकनाथ पाटील- कोल्हापूर -शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी दिवस-रात्र शहरात फेरफटका मारणारे गस्तीवरचे पोलीस सध्या ‘टाईमपास’ करू लागल्याने चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. त्यांचा हा ‘टाईमपास’ नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याची परिस्थीती आहे. ते कोठे असतात याची शहानिशादेखील होत नाही. त्यामुळे गस्तीवरील पोलीस आॅन ड्यूटी घरी किंवा इतर वैयक्तिक कामातच गुंतल्याची चर्चा आहे.
शहरात गेल्या चार दिवसांपासून करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिंगणापूर येथील गोडावूनसह फुलेवाडी रिंगरोड परिसरात भरदिवसा प्लॅट फोडून चोरट्यांनी १२ तोळे दागिने लंपास केले. त्या पाठोपाठ राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राजोपाध्येनगरात एकाच दिवशी चेन स्नॅचिंगच्या तीन घटना घडल्या. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तर चोरट्यांनी कहरच केला आहे. साईक्स एक्स्टेंशन परिसरात घरफोडीसह एकाच दिवशी परीख पूल, वटेश्वर मंदिर व बागल चौकात पत्ता विचारण्याचा बहाणा करून भरदिवसा नागरिकांच्या बॅगा लंपास केल्या. चेन स्नॅचरच्या घटनांमुळे महिलांना घराबाहेर पडणे असुरक्षित झाले आहे. रोजच्या घरफोड्या व चेन स्रॅचरच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.


चाप कोण लावणार ?
शहरात पाच पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीनुसार दिवस-रात्र परिसरामध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली जाते. ही पथके नेमकी असतात कोठे? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. दिवस-रात्र गस्तीवरचे पोलीस ‘टाईमपास’ करूलागले आहेत. त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण नाही. ते कोठे असतात याची शहानिशादेखील केली जात नाही. गस्तीवरील पोलिस आॅन ड्यूटी कमी आणि घर आणि हॉटेल-लॉजमध्ये त्यांचा वावर असल्याची चर्चा आहे. वायरलेसवरून त्यांना विचारणा केल्यास ते परिसरात फिरत असल्याचा संदेश देतात. अशा कामचुकार आणि टाईमपास पोलिसांना चाप लावणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


शहरात घरफोड्या व चेन स्नॅचिंगच्या घटना रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. यापूर्वीही चुकीचे लोकेशन सांगून ‘टाईमपास’ करणाऱ्या गस्तीवरच्या पोलिसांवर कारवाई केली आहे. यातूनही काही पोलीस ‘टाईमपास’ करीत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. गस्तीवरील पथकावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. तसेच दिवसांतून तीनवेळा नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत.
- भरतकुमार राणे, शहर पोलीस उपअधीक्षक

Web Title: Day snatching; Looter in the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.