आजरा तालुक्यात डॉल्बी बंदी कधी?
By Admin | Updated: June 11, 2015 00:17 IST2015-06-10T23:48:39+5:302015-06-11T00:17:15+5:30
तरुणांची वरातीत हुल्लडबाजी : मद्यपानाबरोबरच अनेक व्यसनांमुळे चिंता

आजरा तालुक्यात डॉल्बी बंदी कधी?
कृष्णा सावंत - पेरणोली -आजरा तालुक्यात वरातीमधील तरुणांची हुल्लडबाजी चिंताजनक असून, डॉल्बीच्या अमर्याद आवाजामुळे आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात वरातीच्या नावाखाली सुरू झालेल्या व्यसनाधिनतेमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.
सध्या लग्नसराईचा हंगाम जोरदार सुरू असल्यामुळे तरुणाईचे पाय प्रत्येक वरातीमध्ये थिरकत आहेत. नृत्य करणे हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. नृत्यामुळे निखळ आनंद मिळतो व मानसिकदृृष्ट्या माणूस सक्षम होतो हे खरे आहे. परंतु वरातीत नृत्याच्या नावाखाली तरुणांचे सुरू झालेला धिंगाणा, नृत्यासाठी ‘किक’ बसावी म्हणून सुरू असणारे मद्यपान मात्र चिंताजनक बनले आहे.
आजरा तालुक्यात खास वरातीसाठी १००-१५० तरुणांचे टोळके बनले आहे. दारुची व्यवस्था केली की कुणीही कुठल्याही गावात आॅर्डर द्यायची की, ते टोळके हजर. यातील अनेक तरुण प्रत्येक गावांत जाऊन वरातीमध्ये धिंगाणा घालत आहेत. या टोळक्यासाठी वधू-वरांचे पालक लाखो रुपयांचा खर्च करीत आहेत.
वरातीच्या नावाखाली दारूचा महापूर सुरू झाला आहे. समाजात गरजूंना गोरगरिबांना कधीही मदत न करणारे पालक मात्र हौसेपोटी लाखो रुपये दारुवर खर्च करीत आहेत. आठवीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंतची मुले वरातीमधून दारू, गांजा, सिगारेटच्या आहारी जात आहेत. समाजाला दिशा देण्याची क्षमता असणाऱ्या तरुणांना वरातीमधून चुकीची दिशा मिळत आहे.
डॉल्बीच्या दणक्याने हृदयविकाराचा झटका येऊन निधन झालेल्या जिल्ह्यातील घटना ताज्या असतानाही पालकवर्ग तरुणांच्या हट्टापोटी डॉल्बी लावत आहेत. पूर्वीची लग्नामधील भारतीय परंपरेची समयी, ब्रँड, हद्दपार झाल्याने डॉल्बीला महत्त्व वाढले आहे. डॉल्बीच्या अतिरेकामुळे अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे वरातीमधील डॉल्बी व व्यसनाधिनता कमी करण्यासाठी प्रत्येक ग्रामसभेत ठराव करून अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बालवयातच व्यसन
वरातीमध्ये अनेक लहान मुले नाचतात. तरुणांकडील दारूचे बॉक्स पाहून अनेक लहान मुलांनाही बालवयातच व्यसन लागत आहे. ही वस्तुस्थिती सध्या ग्रामीण भागात आहे.